नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताची स्टार पॅडलर मनिका बात्रा आगामी आशियाई चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघातून बाहेर फेकली गेली. सोनेपत येथील सक्तीच्या राष्ट्रीय शिबिरात सहभागी न झाल्याने निवडीत तिचा विचार केला गेला नाही. ही स्पर्धा दि. 28 सप्टेंबरपासून दोहा येथे खेळवली जाणार आहे.
जागतिक क्रमवारीतील 56 व्या मानांकित पॅडलरच्या गैरहजेरीत 97 व्या मानांकित सुतिर्था मुखर्जीकडे महिला संघाची धुरा असेल. ऐहिका मुखर्जी (131 वी मानांकित) व अर्चना कामत (132 वी मानांकित) हे संघातील अन्य सदस्य असतील.
पुरुषांमध्ये 33 व्या मानांकित शरथ कमलकडे नेतृत्व असेल. जी. साथियन (38 वे मानांकन), हरमीत देसाई (72), मानव ठक्कर (134) व सनील शेट्टी (247) यांचाही यात समावेश आहे. पॉवरहाऊस चीनचा संघ या स्पर्धेत सहभागी होणार नाही. त्यामुळे, भारतीय पथकाला दोन्ही गटात पदकांची लयलूट करण्याची उत्तम संधी असेल.









