काळ्य़ाकुट्ट अक्षरात लिहून ठेवाव्यात अशा घटना जगात नेहमीच घडत असतात. 25 मे 2020 रोजी पोलिसांच्या क्रौर्याला जॉर्ज फ्लॉईड हा आफ्रिकन अमेरिकन बळी पडला. ही अशीच एक काळीकुट्ट घटना. एखादा गुन्हा कबूल करून घेण्यासाठी पोलिसांनी चार फटके दिले आणि त्यातला एखादा वर्मी बसून आरोपीचे प्राण गेले असे होऊ शकते. आरोपीचा पाठलाग करताना पोलिसांनी गोळी झाडली आणि तिने त्याचा बळी घेतला असेही होऊ शकते, परंतु जॉर्ज फ्लॉईडच्या बाबतीत जे घडले ते कल्पनेच्या पलीकडचे आहे. डेरेक शॉव्हिन या गौरवर्णीय पोलीस अधिकाऱयाने फ्लॉईडच्या मानेवर आपल्या गुडघ्याने दाब दिला. फ्लॉईडला रस्त्यातच उपडी पाडून तब्बल आठ मिनिटे 46 सेकंद हा गोऱया रंगाचा परंतु काळ्या काळजाचा पोलीस त्याच्या मानेवर गुडघा दाबून बसला होता.
फ्लॉईड उठण्याची धडपड करत होता. त्याला धरून ठेवण्याचे काम आणखी दोन पोलीस करत होते आणि चौथा रस्त्याने येणाऱया-जाणाऱयांना तेथून हुसकावून लावत होता. इतक्या काळातली शेवटची तीन मिनिटे फ्लॉईड कोणतीही हालचाल न करता निपचित पडला होता आणि त्याची नाडी बंद पडली होती. या प्रकारानंतर दोन वेळा शवचिकित्सा झाली. पहिली चिकित्सा सरकारी होती आणि काही गुंगी आणणाऱया आणि मादक पदार्थांचा परिणाम म्हणून फ्लॉईडची श्वसनक्रिया बंद पडली असा तिचा अहवाल होता. फ्लॉईडच्या कुटुंबीयांनी दुसरी चिकित्सा करून घेतली आणि बराचवेळ कृत्रिमरित्या अडथळा आल्याने मानेच्या भागातून मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह बंद पडल्याने तो मृत्यू पावला असा निष्कर्ष निघाला.
कृष्णवर्णीयांना जीवे मारण्याच्या अमेरिकेतील पोलिसांकडून आजवर अनेक घटना घडल्या आहेत आणि फ्लॉईडचा मृत्यूही त्यातील सर्वात क्रूर आणि जाणूनबुजून केलेली गोष्ट आहे, असे प्रथम टप्प्यात मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होते. सुरुवातीला दिलेल्या दोन उदाहरणांप्रमाणे चुकून वर्मी फटका बसून किंवा पळण्यास प्रतिबंध करण्यासाठी झाडलेली गोळी लागून फ्लॉईडचा मृत्यू झाला नाही. आपण पावणेनऊ मिनिटे मनुष्याच्या मानेवर गुडघा दाबून धरला तर त्या मनुष्याचे काय होईल हे ठाऊक असणाऱया पोलिसाने केलेल्या कृत्यामुळे त्याचा जीव गेला. या भयंकर घटनेचे तीव्र पडसाद अमेरिकेतत उमटणे स्वाभाविक आहे. ते उमटलेही, अमेरिकेतील सर्वच्या सर्व 50 राज्यात ते उमटले आणि अमेरिकेसह पाश्चात्य जगातील चारशे शहरात नागरिकांनी रस्त्यावर उतरून उग्र निदर्शने केली. अमेरिकेतील पोलीस यंत्रणांच्या क्रूर वर्तनाला आणि पद्धतशीरपणे वर्णविद्वेषी धोरण बाळगण्याच्या वृत्तीला आळा घातला पाहिजे ही या नागरिकांची प्रमुख मागणी आहे.
अमेरिकेत या निदर्शनांच्या निमित्ताने उद्भवलेली स्थिती अभूतपूर्व आहे. घटना घडली त्या ठिकाणच्या पोलीस दलाचेच विसर्जन तेथील प्रशासनाने केल्याचेही वृत्त आले आहे. परंतु तेवढय़ावर न थांबता संपूर्ण पोलीस यंत्रणांचे शुद्धीकरण झाले पाहिजे ही जनतेची रास्त मागणी आहे. अमेरिकेतील गोऱया पोलिसांनी कृष्णवर्णीयांना क्रौर्याची वागणूक देणे ही तिथे मुरलेली गोष्ट आहे. रोझा पार्क या महिलेला बसमध्ये गोऱयांसाठी राखीव असलेल्या बैठकीवर बसण्यास गोऱया चालकाने परवानगी न दिल्याने उसळलेल्या आंदोलनानंतर तेथील न्यायालयाने ‘काळे गोरे भेद’ बेकायदा ठरवल्याला 60 वर्षे होऊन गेली तरीही तिथल्या गोऱयांच्या ‘मनातला वर्णभेद’ नाहीसा झाला नाही त्याचे हे द्योतक आहे. वर्णभेद ही अमेरिकतील गंभीर सामाजिक समस्या आहे यावर सत्तर टक्के लोकांनी शिक्कामोर्तब केल्याचे उघड करणारी सर्वेक्षणे झाली तरीही ही मोठी समस्या आहे हे मान्य करण्यास अमेरिकन सरकार तयार नाही. उलट अशाप्रकारे क्रौर्याची परिसीमा गाठणाऱया पोलीस दलांचा आर्थिक निधी काढून घ्या, अशी मागणी केल्यामुळे ‘परिस्थिती आणखी चिघळेल’ असे ‘व्हाइट हाऊस’मधून सांगण्यात आले.
एकीकडे हा गंभीर विषय किरकोळ मानण्याची वृत्ती आणि दुसरीकडे जनतेच्या भावनांच्या या उद्रेकाचे वार्तांकन करणाऱया पत्रकारांवर केली जाणारी दडपशाही अशी परिस्थिती अमे†िरकेत निर्माण झाली आहे. पोलिसांचे वर्तन सुधारण्याची मागणी करणाऱयांची ‘सर्वंकष डावे’ अशी संभावना करून मला ‘कायदा आणि सुव्यवस्था’ सांभाळायची आहे, असे ट्विट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत आहेत.
अमेरिकन पोलिसांचे क्रौर्य आणि पद्धतशीर वर्णविद्वेष या विरोधात संघटितपणे कार्य करणाऱया ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ (प्रश्न कृष्णवर्णीयांच्या जीवनाचा) या चळवळीने फ्लॉईड मृत्यू प्रकरणानंतर जोर धरला. ट्रेव्हॉन मार्टिन या अशाच कृष्णवर्णीयाच्या खुन्याची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर 2013 साली ही चळवळ संघटित झाली. अमेरिका, पॅनडा आणि इंग्लंडमध्ये तिचे कार्य चालते. गोऱयांचा अन्यायी वरचष्मा हटवणे आणि कृष्णवर्णीयांचे सक्षमीकरण करणे ही तिची उद्दिष्टय़े. हिंसाचाराचा प्रतिकार करणे, कृष्णवर्णीयांच्या संकल्पना आणि नवरचना यासाठी अवकाश निर्माण करणे आणि त्यांचे जीवन आनंदी बनवणे यासाठी ती सतत कार्यरत असते. या संस्थेचे कार्य केवळ कृष्णवर्णीयांपुरते मर्यादित नाही. तृतीयपंथी, अपंग, महिला, अनोंदणीकृत लोक अशा सर्वांसाठी ती झटत असते. गुरुदेव टागोर यांच्या शब्दात सांगायचे तर ‘जेथे चित्र भयशून्य असेल’ असे जग निर्माण करणे हे या चळवळीचे ध्येय आहे.
परंतु अशाप्रकारचे वातावरण निर्माण करणे सोपे नाही. तीन महिन्यांपूर्वी आपल्या देशात कोटय़वधी रुपये खर्चून ज्यांचे अतिभव्य स्वागत झाले आणि त्यानंतर अवघ्या महिनाभरातच ज्या आमच्या मित्राने हे औषध पुरविले नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत असा दम आम्हाला भरला त्या डोनाल्ड ट्रम्प महाशयांना या निर्भय वातावरणाचेच वावडे आहे. तितकेच वावडे त्यांना वृत्तपत्र स्वातंत्र्याचेही आहे. वास्तविक अमेरिकन राज्यघटनेच्या ‘पहिल्याच घटना दुरुस्ती’ने वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आणणारा कोणताही कायदा अमेरिकन लोकप्रतिनिधीगृह करणार नाही आणि लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते असणाऱया वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य अबाधित राहील असे निःसंदिग्धपणे नमूद करण्यात आले. परंतु पत्रकारांना धमक्या देणे आणि त्यांच्याविरुद्ध बळाचा वापर करणे, प्रसंगी प्राणघातक शस्त्रांची त्यांना भीती दाखवणे हे प्रकार अमेरिकन पोलिसांकडून इतक्या बटबटीतपणे घडतात की ‘युनो’च्या मानवाधिकार परिषदेला त्याची दखल घेऊन इशारा देणे भाग पडले. ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांबाबत वैरभावाचे आणि असहिष्णुतेचे वातावरण जोपासले असे ‘युनो’च्या तज्ञांचे निरीक्षण आहे. परंतु पहिल्या राष्ट्राध्यक्षीय कारकीर्दीच्या समाप्तीच्या जवळ आलेले आणि दुसऱयांदा आपणच त्या खुर्चीत बसणार याची ‘बिनबुडाची’ खात्री असलेले ट्रम्प कोणाचे ऐकायला तयार नाहीत. ‘मनातल्या वर्ण’द्वेषाने अमेरिकेला विनाशाच्या वाटेवर आणून सोडले आहे.
राजेंद्रप्रसाद मसुरकर, 9960245601








