महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून ’कोणता झेंडा घेऊ हाती’ अशा गोंधळलेल्या मनस्थितीत असणाऱया राज ठाकरे यांनी अखेर शिवमुद्रा असणारे भगवे निशाण हाती घेतले आहे. माझा ’डीएनए’च भगवा झेंडा आहे, असे फटकारत त्यांनी भगव्या झेंडय़ावर प्रश्न उपस्थित करणाऱयांची तोंडे गप्प करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या राज्यात वैचारिक घुसळणीमुळे सर्वच राजकीय पक्षात विचारधारा बदलाचे वारे जोरात वाहू लागले आहे. भाजपला रोखण्यासाठी सत्तेची फेरमांडणी झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षांनी सत्तेत एकत्र येण्यासाठी सर्वप्रथम आपापल्या पक्षांची कुंपण भिरकावून दिली. मूळ विचारधारेत प्रचंड तफावत असूनही धर्मनिरपेक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीने कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेशी युती केली. शिवसेनेनेही त्यांचा हिंदुत्ववादी मित्र भाजपला सोडचिठ्ठी देत आपल्या हिंदुत्वाला मुरड घालत काँग्रेसच्या विचारधारेशी जुळवून घेतले. आता राज्यातल्या बदललेल्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीच्या मुद्यासोबतच आक्रमक हिंदुत्वाचा अजेंडा पुढे करून भाजपशी जवळीक केली आहे. केवळ हिंदुत्वच नव्हे तर सर्व जाती धर्माचे प्रतिनिधित्व करणाऱया झेंडय़ाच्या ठिकाणी शिवमुद्रा असणारा भगवा झेंडा आणून शिवसेनेची जागा घेण्याचा प्रयत्न मनसेने सुरू केला आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी व मनसेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपल्या पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट केली. भाषणाच्या सुरुवातीला नेहमी ‘माझ्या तमाम मराठी बांधवांनो’ अशी साद घालणाऱया राज ठाकरे यांनी परवा गुरुवारी प्रथमच ‘माझ्या हिंदु बांधवांनो’ असा पुकारा करून बाळासाहेबांच्या खास स्टाईलमध्ये सेनेच्या ‘सॉफ्ट हिंदुत्वाच्या’ मुद्यावरून नाराज असणाऱया तमाम शिवसैनिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. राजकारण विशेषतः सत्तेचे राजकारण नेहमीच सामान्यांच्या तर्कापलीकडे असते. लंबकाप्रमाणे ते दोलायमान असते. राजकीय अपरिहार्यतेतून निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी पक्षाच्या ध्येयधोरणांमध्ये लवचिकता आणून परिस्थितीनुसार विशिष्ट दिशा देण्याची भूमिका सर्वच राजकीय पक्षांचे नेते करत असतात. जनसंघाचा भाजप झाला. केडर बेस्ड पक्षाचे रूपांतर मास बेस्ड झाले. मध्यंतरी अटलबिहारी वाजपेयींच्या काळात त्याला समाजवादाची झालर लावण्याचा प्रयत्न झाला परंतु लालकृष्ण अडवाणींनी भाजपची दिशा पुन्हा हिंदू राष्ट्रवादाकडे वळवली. सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून भाजप सध्या प्रखर हिंदू राष्ट्रवादाकडे जात आहे. काळानुरूप सर्वच राजकीय पक्ष आपापल्या भूमिकांमध्ये बदल करतात. पण टप्प्याटप्प्याने कार्यकर्त्यांमध्ये ते रुजवावे लागतात. शिवसेनेचा प्रवासही मराठी अस्मितेतून हिंदुत्वाकडे गेला. राजकारण म्हणजे गजकर्ण म्हणणाऱया बाळासाहेबांनीही प्रसंगी आघाडय़ा बिघाडय़ांचे राजकारण करून राजकीय मुत्सद्देगिरी दाखवली. 1995 ला सत्ता काबीज केली. हे सर्व बदल शिवसेनेने पचवले. कारण पक्ष बांधणी मजबूत होती. या सर्व पार्श्वभूमीवर विचार केल्यास मनसेचा भूमिका बदलाला वेग आहे. बांधणी नसल्यामुळे हे बदल खालीपर्यंत पोहोचत नाहीत. भूमीपुत्र, मराठी व उत्तर भारतीयांचा मुद्दा, नमो मोदी, हटाव मोदी, पुन्हा मोदी. गेल्या काही वर्षातील हे बदल ना कार्यकर्ते पचवू शकले ना मतदार. म्हणूनच मनसेपासून मतदार हळूहळू दूर गेला हे वास्तव आहे. मनसेच्या प्रारंभीच्या काळात पहिल्याच दणक्यात तेरा आमदार मतदारांनी निवडून दिले होते. हे मोठे यश होते. अपेक्षांचा अंकुर फुटत होता,पण कालांतराने मतदारांचा अपेक्षाभंग होत गेला. पक्षाची स्पष्ट भूमिका, विचारधारा वारंवार मतदारांसमोर अधोरेखित करावी लागते. त्याचवेळी पक्षातील पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते. लोकांचे ज्वलंत प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरावे लागते. या माध्यमातून कार्यकर्त्यांनाही ऊर्जा मिळत असते. ते क्रियाशील राहतात. अन्यथा संघटनेत शिथिलता अथवा एक प्रकारचे साचलेपण येण्याची शक्यता असते. संघटनेत वरपासून खालीपर्यंत प्रवाहीपण नसेल तर तो पक्ष पुढे सरकत नाही. सध्या मनसेची अशीच अवस्था आहे. निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरे यांच्या दोन-चार जाहीर सभा वगळता पक्षातील दुसऱया तिसऱया फळीतील एकही पदाधिकारी किंवा नेत्याची जाहीर सभा होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून संसदेपर्यंत या पक्षाचे अस्तित्व नगण्य आहे. एकच आमदार आहे. पक्षाची स्थापना होऊन 14 वर्षे लोटली. सध्याच्या तंत्रयुगाच्या जगात हा काळ थोडाथोडका मानता येणार नाही. या कालावधीत जिह्या-जिह्यांमध्ये निदान संघटनात्मक पातळीवर बांधणी व्हायला हवी होती. ती झाली नाही. पुढील काळात पक्षातील संघटनात्मक रचना घट्ट करणार असल्याचे ठाकरे यांनी गुरूवारी झालेल्या सभेत सांगितले आहे. पाहूया काय होते ते. ज्या शिवसेनेची मनसे जागा घेऊ इच्छिते, त्या शिवसेनेने प्रारंभापासून पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यावर भर दिला. बाळासाहेब ठाकरेंनी तर महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यांच्या आक्रमक वक्तृत्वाने हजारो कडवे शिवसैनिक तयार झाले. किंबहुना त्यांच्या पश्चात आजही ग्रामीण भागात त्यांची पाळेमुळे घट्ट आहेत. दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, प्रमोद नवलकर, मधुकर सरपोतदार, मनोहर जोशी अशा एकापेक्षा एक दुसऱया-तिसऱया फळीतील नेत्यांची फौज बाळासाहेबांनी तयार केली. राज ठाकरे यांचे उत्स्फूर्त आणि घणाघाती वक्तृत्व त्याचप्रमाणे बाळासाहेबांच्याकडे झुकणारे व्यक्तिमत्व या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. इतक्या वर्षांनंतरही त्यांचा करिष्मा आजही टिकून आहे. अजूनही त्यांच्याकडून मतदारांना अपेक्षा आहेत. राज्यातील कुठल्याही नेत्याला लाभणार नाही असा श्रोतावर्ग त्यांच्या सभांना उपस्थित असतो. राज ठाकरेंचे मनसे वर्धापन दिनानिमित्तचे भाषण हे बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांची आठवण करून देणारे होते, हे निश्चित. बाळासाहेबांच्या सर्व आक्रमक हिंदुत्वाच्या मुद्यांची त्यांनी भाषणात उजळणी केली. माझ्या धर्माला नख लावाल तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, देशाशी प्रामाणिक असलेले मुस्लीम आमचे आहेत, धर्म घरात ठेवा, भोंगा लावून नमाज कसले पढताय? जर युद्ध झाले तर सैन्याला बाहेर जाण्याची गरज नाही, बांगलादेशी-पाकिस्तान मुस्लिमांना हाकलून द्या. ही सर्व भाषा बाळासाहेबांची असली तरी जेव्हा ’बाळासाहेब म्हणजेच शिवसेना म्हणजेच पर्यायाने शिवसैनिक’ असे नाते राज ठाकरे आणि ’मनसैनिक’ यांच्यात तयार होईल, राज ठाकरे आणि मनसे जनतेचे प्रश्न घेऊन लोकांपर्यंत पोहचतील तेव्हाच त्यांच्या वर्धापनदिनाच्या भाषणाची फलनिष्पत्ती होईल.
Previous Articleस्क्रिझोफेनिया नंतरही जीवन आहे…
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.