ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मनरेगा योजनेसाठी केंद्र सरकारने दिलेल्या 40 हजार कोटींचे अतिरिक्त पॅकेजचा उल्लेख करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सोमवारी ट्विट करून आभार मानले.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनरेगा योजनेसाठी यू – टर्न घेतला आहे. केंद्र सरकारकडून मनरेगासाठी दिलेल्या 40 हजार कोटींच्या तरतुदीसाठी आभार मानले आहेत. तसेच मनरेगाच्या दूरदर्शीपणाला समजण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो असेही म्हटले आहे.

यासोबतच राहुल गांधी यांनी ‘मोदी यु टर्न ऑन मनरेगा’ असा हॅशटॅग वापरला आहे. त्याचबरोबर राहुल गांधी यांनी 2014 मधील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदेतील भाषणाचा जुना व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनरेगा बद्दल बोलताना, ही योजना म्हणजे काँग्रेसच्या अपयशाचे मोठे उदाहरण असे म्हटले होते. गेल्या साठ वर्षांत काँग्रेसने न केलेल्या कामाचे फळ म्हणजे मनरेगा होय, असे म्हटले होते. पंतप्रधानांचा तोच व्हिडिओ राहुल गांधी यांनी शेअर केला आहे.









