निसर्ग… खरं तर वर्णन करायला अवघड आणि समजून घ्यायला खूप कठीण, असा हा विषय. पण ह्या शिवाय कोणत्याही सजीवाला अस्तित्वच नाही. उत्क्रांतीमध्ये एकपेशीय अमिबापासून ते गुंतागुंतीच्या अनेकपेशीय सजीवापर्यंत सगळय़ांच्या घटकांचा तो एक अविभाज्य अंग आहे. त्यातलाच एक महत्वाचा घटक पक्षी. पक्ष्यांचे निरीक्षण करणे, अभ्यास करणे, त्यांचे संगोपन व संवर्धन करणे हाच या पक्षीदिनाचा उद्देश आहे.
प्राण्यांचे सस्तन प्राणी आणि पक्षी असे उपवर्ग पडतात. पक्ष्यांची व्याख्या करणे सोपे आहे. पिसे व पंख असलेले प्राणी म्हणजे पक्षीच. पक्षी साधारणपणे उडताना, घरटी बांधताना आणि अंडी घालताना पहायला मिळतात. म्हणून सगळे पक्षी सारखेच असतात, असा समज आहे. परंतु जरा बारकाईने निरीक्षण केले तर ह्या पक्ष्यांमध्ये विविध प्रकारचे आकार असतात आणि ते इतर पक्ष्यांच्या तुलनेत एकसारखे नसतात. ह्याचे उदाहरण बघायचे ठरले तर मानवाच्या हाताच्या अंगठय़ाएवढा इवलासा सुमधुर गुणगुणणारा हमिंग बर्ड तर दुसरीकडे घोडय़ाच्या तट्टाएवढा उंच आणि मोठा शहामृग असे वेगळेपण बघायला मिळते.
हजारो मैल उड्डाण करणारे पक्षी तर जमिनीला कधीच न सोडणारे पेंग्वीनसारखे पक्षीही बघायला मिळतात. गुंतागुंतीची परंतु सुरेख रचनेची घरटी बांधणारे विणकर पक्षी, तर जमिनीवर अंडी घालणारे पक्षीसुद्धा बघायला मिळतात. विशिष्ट प्रकारचे अन्न खाणारे, मृतदेहावर ताव मारणारे असेही पक्षी आपल्या सभोवताली बघायला मिळतात. वर्षातून दोन वेळेस लांब अंतरावर स्थलांतर करणारे तर सगळे आयुष्य छोटय़ाशा बागेत घालवणारेसुद्धा पक्षी आढळतात.
आजमितीला पृथ्वीवर पक्ष्यांच्या जवळपास 8650 जाती असून भारतातील 1200 पक्ष्यांच्या जाती 75 कुलांचे आणि 20 गणांचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजेच भारतातील पक्ष्यांची संख्या मोठी आहे आणि एकाच देशात आढळणाऱया पक्ष्यांचे विविध प्रकार ह्यात आढळतात. आपल्या देशात आढळणारे थंड हवामान, राजस्थानमधील कोरडे वाळवंटी हवामान, डोंगराळ भागातील थंड हवामान, उष्ण आणि दमट हवामान, हिमालयातील थंड हवामान असे हवामानाचे वैविध्य आपल्या देशात आढळून येते आणि पक्ष्यांसाठी हे अनुकुल ठरते.
भारतात दाट व विरळ जंगले, मोकळी मैदाने, शेत, समुद्र किनारपट्टी, नद्यांची पात्रे, खडकाळ डोंगर आणि उंच पर्वत रांगा असा भूप्रदेशदेखील अनेक पक्ष्यांना आकर्षित करत असतो. जगामध्ये आढळणाऱया पक्ष्यांच्या विविध जातींचे अनेक प्रकार भारतात आहेत. काही पक्षी वर्षभर वास्तव्य करतात तर अनेक परदेशी पक्षी हिवाळय़ात स्थलांतर करून भारतात येत असतात.
पक्षी वाचवण्यासाठी खूप उपाय केले जात आहेत, हे नक्कीच आशादायक आहे पण ते शाश्वत असावेत. कारण तात्पुरती मलमपट्टी ही फारशी उपयोगी ठरत नाही. लोक सहभागाशिवाय कोणतेही संवर्धन पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे पक्षी संवर्धन करताना स्थानिक लोक सहभाग हा खूप मोठा असला पाहिजे. तरच पक्षी जगतील, वाढतील नाहीतर काही दिवसांनी काही पक्षी हे चित्रात आपल्या साहित्यातच राहतील.
सर्व छायाचित्रे : अमृत बिर्जे










