दि.23 पासून न्यायालयाला उन्हाळी सुटी
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाचा तिढा सुटता सुटेनासा झाला आहे. याबाबत धारवाड उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीला तारखा मिळत आहेत. सोमवार दि. 19 रोजी होणारी सुनावणी गुरुवार दि. 22 पर्यंत लांबणीवर पडली आहे. त्यामुळे वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाच्या वादावर पडदा कधी पडणार? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
मनपा वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली, पण हे काम पारदर्शीपणे झाले नसल्याने वादाच्या भोवऱयात सापडले आहे. वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण नव्याने करण्याचे प्रतिज्ञापत्र नगरविकास खात्याने धारवाड उच्च न्यायालयात दाखल केले होते. पण बेंगळूर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवून केवळ वॉर्ड आरक्षण नव्याने जाहीर करण्यात आले होते. आरक्षणाबाबत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शहरवासियांनी आक्षेप नोंदविले होते. याच दरम्यान माजी नगरसेवकांनी धारवाड उच्च न्यायालयात धाव घेऊन बेंगळूर उच्च न्यायालयाच्या आदेशाचा फेरविचार करावा, अशी याचिका दाखल केली आहे. याबाबत न्यायालयाने नगरविकास खाते आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली होती. निवडणूक आयोगाने आपले म्हणणे मांडले आहे. पण नगरविकास खात्याने अद्याप म्हणणे मांडण्याकरिता वेळ घेतला होता. पोटनिवडणुकीमुळे याचिकेची सुनावणी लांबणीवर पडली होती. सदर सुनावणी सोमवार दि. 19 रोजी होती. पण सोमवारी याचिकेचा क्रमांक 142 वा होता, त्यामुळे सुनावणी झाली नाही. गुरुवार दि. 22 रोजी सुनावणीची तारीख देण्यात आली आहे. पण कोरोनाचा प्रसार वाढला असून राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. दि. 23 पासून न्यायालयाला एक महिन्याची उन्हाळी सुटी आहे. त्यामुळे सुनावणी होणार की लांबणीवर पडणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.









