महसूल अधिकारी-वॉर्ड क्लार्क नसल्याने कार्यालयाचे दरवाजे बंद
प्रतिनिधी/ बेळगाव
मनपाच्या विभागीय महसूल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने गोवावेस, कोनवाळ गल्ली, रिसालदार गल्ली आणि अशोकनगर येथील कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले आहे. कार्यालयांचे दरवाजे बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे मनपाचे अधिकारी कधी उपलब्ध होणार, अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
विभागीय महसूल कार्यालयात कार्यरत असणारे महसूल अधिकारी आणि वॉर्ड क्लार्क मुख्य कार्यालयात ठाण मांडून आहेत. मुख्य कार्यालयात जीपीएस आराखडय़ाचे काम सुरू असल्याने वॉर्डची हद्द व आवश्यक माहिती देण्यासाठी शहरातील 15 वॉर्डच्या महसूल अधिकाऱयांना व वॉर्ड क्लार्कना सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे गोवावेस कार्यालय, कोनवाळ गल्ली, रिसालदार गल्ली आणि अशोकनगर कार्यालयातील अधिकारी सुभाषनगर येथील महापालिका मुख्य कार्यालयात आहेत. त्यामुळे विभागीय कार्यालयातील कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. या कार्यालयामध्ये कोणीच उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. खाता बदल करणे, नाव नोंद करणे, फॉर्म क्र. 2 किंवा चलन घेणे अशा विविध कामासाठी नागरिक येत आहेत. पण सदर कार्यालयाचे दरवाजे बंद असल्याने नागरिकांना परत जावे लागत आहे. याबबात चौकशी केली असता जीपीएस आराखडय़ाच्या कामासाठी महसूल अधिकारी व वॉर्ड क्लार्क मुख्य कार्यालयात असल्याचे सांगण्यात येत आहे. पण याबाबत विभागीय कार्यालयात कोणतीच सूचना किंवा नोटीस लावण्यात आली नाही. त्यामुळे नागरिक प्रतीक्षा करीत आहेत. बराच वेळ थांबूनही कोणीच भेटत नसल्याने नागरिक परत जात आहेत. हे काम किती दिवस चालणार याची माहितीही देण्यात आली नाही. त्यामुळे नागरिक धावपळ करीत आहेत. जीपीएस आराखडय़ाचे कामकाज किती दिवस चालणार अशी विचारणा होत असून, विभागीय कार्यालयामध्ये कर्मचाऱयांची नियुक्ती करून गैरसोय थांबवावी, अशी मागणी होत आहे.









