प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत संपुष्टात आल्याने प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि.10 मार्च 2019 रोजी प्रशासकपदाचा कार्यभार प्रादेशिक आयुक्तांकडे सोपविण्यात आला होता. मात्र अलिकडेच प्रशासक पदाची जबाबदारी जिल्हाधिकाऱयांकडे सोपविण्यात आली आहे. यामुळे महापालिकेच्या कारभाराची धुरा आता जिल्हाधिकारी डॉ.एस.बी.बोमनहळळी यांच्याकडे देण्यात आली आहे.
महापौर-उपमहापौर पदाचा कार्यकालावधी दि.28 फेब्रुवारी 2019 रोजी संपुष्टात आला होता. मात्र काळजी वाहू महापौर म्हणून दि.9 मार्च 2019 पर्यत जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र दि.10 मार्च पासून महापालिकेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासक म्हणून प्रादेशिक आयुक्तांकडे जबाबदारी देण्यात आली होती. दि. 24 जुलै 2019 रोजी प्रशासकांची मुदत वाढविण्यात आली होती. त्यामुळे प्रादेशिक आयुक्त अमंलान बिस्वास यांच्याकडे प्रशासकपदाची जबाबदारी आहे. महापालिका कायदा 1976 च्या कायदा 100 अन्ववये महापौर-उपमहापौर निवड होईपर्यत प्रशासकांची नियुक्ती करण्यात येते. यानुसार महापालिकेवर प्रशासक नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र यापुढे प्रशासकपदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱयांकडे सोपविण्यात आला असल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. यामुळे यापुढे महापालिका प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी डॉ.एस.बी.बोमनहळळी काम पाहणार आहेत.









