प्रवीण बागेवाडी यांच्याकडे कार्यभार सोपविण्याचा जिल्हाधिकाऱयांचा निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका आयुक्त जगदीश के. एच. हे 15 दिवसांच्या दीर्घ रजेवर गेले आहेत. महापालिका निवडणुका जाहीर झाल्या तरी मनपा कार्यालयात सेवेत रुजू झाले नाहीत. त्यामुळे सध्या प्रभारी आयुक्त म्हणून स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक प्रवीण बागेवाडी यांची नियुक्ती करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी बजावला आहे.
महापालिका आयुक्त 15 दिवसांच्या रजेवर गेले होते. पण जिल्हाधिकाऱयांनी केवळ 3 दिवसांची रजा मंजूर केली होती. मात्र महापालिका आयुक्त जगदीश के. एच. हे 3 दिवसांनंतरही सेवेत रुजू झाले नसल्याने रजेचा अर्ज नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला होता. नगरविकास खात्याने 15 दिवसांची रजा मंजूर करून स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यकारी संचालक प्रवीण बागेवाडी यांच्याकडे आयुक्तपदाचा कार्यभार सोपविला होता. पण 15 दिवसांची रजा संपल्यानंतरही आयुक्त जगदीश के. एच. महापालिका कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. याच दरम्यान महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. आयुक्तांच्या अनुपस्थितीतच निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. आयुक्त सेवेत रुजू होणार असेच सांगण्यात येत आहे. पण आयुक्तांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल क्रमांक बंद असल्याची माहिती मिळत आहे.
निवडणुकीसाठी अर्ज भरणा प्रक्रिया सुरू झाली तरीही आयुक्त रुजू झाले नसल्याने आयुक्तांविना निवडणुका घेण्याची वेळ आली आहे. याबाबत नगरविकास खात्यानेही अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही. परिणामी गेंधळ झाला आहे. निवडणुकीची जबाबदारी सांभाळण्यासाठी जबाबदार अधिकाऱयाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यकारी संचालक प्रवीण बागेवाडी यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश जारी केला आहे. पण प्रवीण बागेवाडी हे देखील सध्या बेळगाव शहरात नाहीत. मात्र शनिवारपर्यंत कार्यभार स्वीकारतील, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी नगरविकास खात्याकडे अर्ज करून वाढीव रजेची मागणी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर केएएस श्रेणीतील अधिकारी रूदेश घाळी यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार सोपविण्याचा विचार शासनाने चालविला होता. पण त्यांच्या नियुक्तीबाबत शासनाने कोणताच आदेश जारी केला नाही. त्यामुळेच सध्या महापालिकेचा कारभार वाऱयावर असून आयुक्तांच्या अनुपस्थितीत निवडणुकीच्या कामाचा गाडा हाकण्याची वेळ अन्य अधिकाऱयांवर आली आहे.









