प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेतील पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांचे पद मागील दोन वर्षांपासून रिक्त आहे. या पदावर प्रभारी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नगरविकास खात्याने या पदावर कायमस्वरुपी अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे. मनपाच्या पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंतेपदी हनुमंत कलादगी यांची नेमणूक केली आहे.
पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंतेपदी उदयकुमार तळवार होते. पण त्यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. विविध अधिकाऱयांकडे या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. मागील काही महिन्यांपासून या पदाचा प्रभारी कार्यभार साहाय्यक कार्यकारी अभियंते महांतेश नरसण्णावर यांच्याकडे होता. मात्र, नगरविकास खात्याने पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंतेपदी कायमस्वरुपी अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे. हनुमंत कलादगी यांची नियुक्ती करण्यात आल्याने मंगळवारी रुजू होऊन या पदाचा कार्यभार कलादगी यांनी घेतला. यापूर्वी ते बागलकोट महापालिकेत कार्यरत होते.
यावेळी महापालिका आरोग्य विभागातील पर्यावरण साहाय्यक अभियंत्यांसह स्वच्छता निरीक्षकांनी पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन स्वागत केले. सदर अधिकाऱयांनी कार्यभार घेतल्यानंतर सर्व अधिकाऱयांची ओळख करून घेऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली. आपल्या जबाबदाऱया व्यवस्थित पार पाडण्याची सूचना केली. स्वच्छतेचे काम वेळेत करण्याबरोबरच नागरिकांना जागरुक करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची सूचना स्वच्छता निरीक्षकांना केली. याप्रसंगी आरोग्य विभागाचे कार्यालयीन व्यवस्थापक अभिषेक कंग्राळकर, पर्यावरण साहाय्यक अभियंते आदिलखान पठाण, प्रवीण किलारी, महादेवी, स्वच्छता निरीक्षक मल्लेश आदिवासी, एस. व्ही. कांबळे, शीतल रामतीर्थ, सादीक धारवाडकर, पुंडलिक राठोड, रुक्सार मुल्ला, सुवर्णा पवार, कलावती आदिमनी आदींसह स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.









