प्रतिनिधी / पेठ वडगाव
गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आनंदराव शांतीनाथ कोरे (वय ५५, रा. जुने पारगाव, ता. हातकणंगले) या वयोवृद्धचा मृतदेह मनपाडळे येथील वन विभागाच्या उजाड माळावर पोलिसांना सापडला. दरम्यान सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या वर्णनानुसार त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.
मयत आनंदराव कोरे हे दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता झाले होते. नातेवाईक त्यांच्या शोधात होते. दरम्यान मनपाडळे येथील वन विभागाच्या उजाड माळावर अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. दरम्यान मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसासमोर एक आव्हान बनले. वयोवृध्दा जवळ विषारी औषध सापडल्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा वडगाव पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी भापोसे डॉ. धीरजकुमार, पो.ना. आर.ए. पाटील, पो.कॉ.के.बी.पाटील, पो. कॉ.संदीप गायकवाड यांनी करून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला.
दरम्यान, मृताच्या वर्णनानुसार मयत हा जुने पारगावचे आनंदराव कोरे असल्याची ओळख नातेवाईकांनी पटविली. यानुसार कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आलेला मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकाच्या ताब्यात दिला. याची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास प्रभारी अधिकारी वडगाव पोलिस ठाणेचे प्रभारी अधिकारी भापोसे डॉ. धीरजकुमार हे करीत आहेत.









