शहरात तीन ठिकाणी 220 बेड उपलब्ध ; उपचार घेण्याकडे रुग्णांची पाठ
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णालयांमध्ये बेड मिळणे मुश्कील झाले आहे. यामुळे काही रुग्णांना घरात औषधोपचार घ्यावा लागत आहे. यामुळे महापालिका व आरोग्य खात्यातर्फे शहरात विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करून 220 बेड उपलब्ध केले आहेत. पण याकडे नागरिकांनी पाठ फिरविली असल्याने केवळ 43 कोरोनाबाधितांना दाखल करण्यात आले आहे. घरात जागा उपलब्ध नसलेल्या नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हा रुग्णालयात बेड मिळणे मुश्कील बनले आहे. तसेच खासगी रुग्णालयात दाखल झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना बिल परवडणारे नाही. त्यामुळे नागरिक घरीच उपचार घेत आहेत. शहरात दररोज हजारहून अधिक कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळे सर्वांना जिल्हा रुग्णालयात बेड मिळत नाहीत. तसेच घरी उपचार घेताना घरातील अन्य सदस्यांना कोरोनाची बाधा होत आहे. त्यामुळे घरी जागा नसलेल्या कोरोनाग्रस्तांसाठी महापालिका, आरोग्य खाते व समाज कल्याण खात्याच्यावतीने कोविड केअर सेंटर सुरू केली आहेत. प्रारंभी तीन ठिकाणी 200 बेडची केअर सेंटर सुरू करण्यात आली. पण ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले. त्यामुळे काही संघटनांनी ऑक्सिजन कॉन्सन्टेटर उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे नेहरुनगर येथील स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये 20 बेडचे सेंटर सुरू करून ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच घरोघरी जावून माहिती घेऊन जागा उपलब्ध नसलेल्या नागरिकांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्याची सूचना करण्यात येत आहे. पण शहरवासियांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. याठिकाणी दाखल झालेले रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या देवराज अर्स वसतिगृहात 27 कोरोनाबाधित आहेत. स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये 3 आणि कुमारस्वामी लेआऊट येथील वसतिगृहात 13 कोरोनाबाधित आहेत. याठिकाणी आवश्यक सुविधा पुरविण्यासह औषधोपचार करण्यात येत आहेत. पण याकडे शहरवासियांनी पाठ फिरविली आहे.









