पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिला दिलासा, जमत नसल्यास कर पुढील वर्षी भरा; दंड लागणार नाही, माजी नगरसेवक संघटनेच्या प्रयत्नांना यश
प्रतिनिधी बेळगाव :
सरकारतर्फे करण्यात आलेली १५ टक्के दरवाढ कमी करता येत नाही. मात्र बेळगाव मनपाने लावलेले वाढीव कर घरपट्टीतून कमी केले जातील. यावर्षी कमी घरपट्टी भरा, अन्यथा पुढील वर्षी भरा दंड लागणार नाही असा दिलासा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी बेळगावकरांना दिला आहे. माजी नगरसेवक संघटनेने मागील तीन महिन्यांपासून चालवलेल्या आंदोलनाला एक यश मिळाले आहे.आता एक वर्षाकरिता वाढीव घरपट्टीतून नागरिकांची सुटका झाली आहे.
घरपट्टी संदर्भात निर्णय घेण्यासाठी आज सर्किट हाऊस येथे विशेष बैठक झाली. पालकमंत्री जारकीहोळी, खासदार सुरेश अंगडी, जिल्हाधिकारी डॉ एम जी हिरेमठ, महानगरपालिकेचे आयुक्त जगदीश के एच व इतर अधिकारी उपस्थित होते. माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी नगरसेवक दीपक वाघेला आणि संजीव प्रभू उपस्थित होते.
मनपाने लावलेले सर्व वाढीव सेस या वर्षी लागू नसतील.पुढच्या वर्षी पुढील निर्णय घेऊ असे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे.









