प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील सरकारी कार्यालये स्मार्ट बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काही कार्यालयांचा कायापालट करण्यात येत आहे. मात्र, महापालिकेचे जुने कार्यालय कचराकुंडी बनली आहे. कार्यालयाच्या मागील बाजूस कचऱयाचे ढिगारे साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे याची स्वच्छता कोण करणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
रिसालदार गल्ली येथील महापालिका कार्यालयाच्या जुन्या इमारतीत तहसीलदार कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे इमारतीचा ताबा तहसीलदार कार्यालयाकडे आहे. पण इमारतीची देखभाल व्यवस्थित केली जात नसल्याने संपूर्ण इमारत दुर्लक्षित आहे. इमारतीची स्वच्छता केली जात नाही. रंगरंगोटीदेखील करण्याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे संपूर्ण इमारत मोडकळीस आली आहे. पावसाळय़ात इमारतीमध्ये पाणी गळत असल्याने भिंतींना तडे गेले आहेत. काही ठिकाणी साहित्य ठेवण्यात आल्याने इमारतीला गोडावूनचे स्वरुप आले आहे.
महापालिका कार्यालय म्हणून नावलौकिक झालेल्या इमारतीची दयनीय अवस्था झाली असून, सदर इमारत कचराकुंड बनले आहे. इमारतीच्या मागील बाजूस कचरा तसेच कार्यालयातील रद्दी टाकण्यात येत असल्याने अस्वच्छता पसरली आहे. तहसीलदार कार्यालय म्हणून केवळ इमारतीचा वापर केला जातो. पण येथील स्वच्छतेकडे कानाडोळा करण्यात आला आहे. परिणामी संपूर्ण परिसर अस्वच्छ बनला आहे.
इमारतीचा ताबा महसूल विभागाकडे देण्यात आल्याने महापालिकेकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही. महापालिकेच्या मालकीची कोटय़वधीची मालमत्ता असूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे इमारतीचा आणि परिसराचा दुरुपयोग होत आहे. इमारतीच्या मागील बाजूस अंधार पसरलेला असल्याने रात्रीच्या वेळी अवैध प्रकार घडत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. मद्यपान व धूम्रपान करणाऱयांसाठी सदर इमारत सोयीची ठरत आहे. महापालिका आणि महसूल विभागाने याकडे कानाडोळा केला असल्याने इमारतीची व परिसराची देखभाल करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दोन्ही विभागांनी जबाबदारी झटकली असून, इमारतीची देखभाल कोण करणार, अशी विचारणा होत आहे. महापालिका प्रशासन येथील समस्येकडे लक्ष देणार का? अशी विचारणा होत आहे.









