लवकरच बजावणार नोटीस : अनधिकृत यादी तयार करण्याचे काम प्रगतिपथावर
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील अनधिकृत बांधकामाची यादी दोन दिवसात सादर करण्याची सूचना नगरविकास मंत्र्यांनी महापालिकेच्या नगरयोजना अधिकाऱयांना केली होती. भाग्यनगर येथील अनधिकृत इमारतीवर कारवाईचा आदेश बजावला होता. त्यामुळे इमारतीचे मोजमाप करून नोटीस बजाविण्याची तयारी करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांच्या मंजुरीनंतर इमारत हटविण्याची नोटीस बजावण्यात येणार आहे. अनधिकृत इमारतींची यादी तयार करण्यासाठी अधिकाऱयांची धावपळ सुरू झाली आहे. येत्या चार दिवसात यादी तयार करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शहरात अनधिकृत इमारतींचा विळखा वाढल्याची तक्रार नगरविकास मंत्र्यांकडे करण्यात आली होती. अनगोळ येथे तीन मजली इमारत बांधण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेण्यात आली होती. मात्र, सदर बिल्डरने सहा मजली बांधकाम केल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे याबाबत नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन नगरविकास मंत्री बसवराज बी. ए. यांनी आढावा बैठकीवेळी मनपा अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले होते. इमारतीचे बांधकाम सहा मजली होईपर्यंत काय करीत होता? असा मुद्दा उपस्थित करून इमारतीची माहिती घेऊन त्वरित कारवाई करण्याचा आदेश बजावला होता. त्यामुळे मनपा नगरयोजना विभागातील अधिकाऱयांनी अनगोळ येथील अनधिकृत इमारतीची पाहणी करून इमारतीचे मोजमाप केले आहे. अनधिकृत बांधकामाची माहिती घेऊन अहवाल तयार करण्यात आला आहे. सदर अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला असून महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्या मंजुरीनंतर सदर इमारतधारकाला नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शहरात अनधिकृत बांधकामाचा विळखा वाढल्याबद्दल नगरविकास मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. शहरातील अनधिकृत बांधकामाची यादी दोन दिवसात सादर करण्याची सूचना केली होती. मात्र, शहरातील अनधिकृत बांधकामाची यादी मनपा अधिकाऱयांकडे उपलब्ध नसल्याने चाचपणी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. अनधिकृत इमारतींची माहिती घेऊन लवकरच नगरविकास मंत्र्यांना देण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याकरिता अधिकाऱयांची धावपळ सुरू झाली आहे.