कोल्हापूर, जयसिंगपूर, मिरज, सांगली आणि सातारा स्थानकांना देणार भेटी
प्रतिनिधी / मिरज
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल हे आज शुक्रवारी मिरज जंक्शनसह कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली आणि सातारा रेल्वे स्थानकांच्या पाहणी दौऱ्यासाठी येत आहेत. सकाळी 11 वाजून 35 मिनीटांनी त्यांची जीएम स्पेशल रेल्वे मिरज जंक्शनवर दाखल होईल. मित्तल हे रेल्वे जंक्शनवरील विविध विभागांची पाहणी करुन अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करतील. कोरोनानंतर पहिल्यांदाच रेल्वे महाव्यवस्थापकांचा हा दौरा होत असल्याने त्यांच्या निरीक्षण भेटीला महत्त्व आले आहे.
महाव्यवस्थापक मित्तल हे सकाळी साडेआठ ते दहा वाजून 20 मिनिटांपर्यंत कोल्हापूर स्थानकाला भेट देतील. त्यानंतर दहा वाजून 50 मिनिटे ते 11 वाजेपर्यंत जयसिंगपूर स्थानकावर पाहणी करतील. त्यानंतर जीएम स्पेशल ट्रेनने ते मिरज जंक्शनवर सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी दाखल होतील. येथे ते सुमारे एक तास म्हणजे 12 वाजून 35 मिनिटांपर्यंत मिरज जंक्शनवरील विविध विभागांना भेटी देऊन स्थानिक प्रतिनिधी आणि रेल्वे प्रवासी संघटनांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारतील. त्यानंतर रेल्वे स्टेशन प्रबंधक आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी त्यांची जीएम स्पेशल ट्रेन सांगली स्थानकाकडे रवाना होईल. तेथे पाहणी झाल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता सातारा स्थानकावर पाहणी करतील.








