नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
छत्तीसगडनंतर आता मध्य प्रदेशातील शाजापूर येथे अपर जिल्हाधिकारी असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने जनता कर्फ्यू कालावधीत दुकान सुरू ठेवल्यामुळे कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मध्य प्रदेशातील मालवा परिसरातील शाजापूर भागात एका मुलांने कर्फ्यू असताना चपलांचे दुकान सुरू ठेवले होते. अपर जिल्हाधिकारी असलेल्या मंजुषा विक्रांत रॉय या त्या मुलावर रागावताना दिसत आहे. सोबत पोलिसांची फौज असून, दुकान बंद करण्याची कारवाई पोलीस करताना पाहायला मिळत आहेत. मात्र, मध्येच महिला अधिकाऱ्याने त्या मुलाच्या कानशिलात लगावल्याचे पाहायला मिळत आहे. या मुलाचे म्हणणे होते की, घरातच त्याचे दुकान आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यात लॉकडाऊन लागू असताना जिल्हाधिकाऱ्यांनी एका युवकाला कोरोना नियमांकडे दूर्लक्ष केल्याने कानशिलात लगावल्याचा आणि त्याचा मोबाईल फोडल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच या जिल्हाधिकाऱ्यांना माफी मागावी लागवली होती.









