प्रतिनिधी / कोल्हापूर
मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुबाडल्याच्या दोन घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्या. प्रवाशांना बेदम मारहाण करत सोने, चांदीच्या दागिन्यांसह, लॅपटॉप असा मुद्देमाल लुटारुंनी लंपास केला. या घटनांची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिंजवडी पुणे येथील एका खासगी कंपनीत सहायक व्यवस्थापक म्हणून नोकरी करणारे केदार घोडके हे 29 जानेवारी रोजी कोल्हापुरात कंपनीच्या कामानिमित्त आले होते. रात्री 11.30 वाजता मध्यवर्ती बसस्थानकात रिक्षा करून शिरोली एमआयडीसी येथे निघाले असताना रिक्षाचालकाने निर्जन स्थळी नेऊन भाडÎाच्या कारणावरून वाद घातला. तेव्हा रिक्षाचालकाचे तीन मित्र तेथेच बसले होते. त्यांनी घोडके यांच्या हातातील लॅपटॉपची बॅग काढून घेतली. रिक्षाचालकाने खिशातील पाकीट, मोबाईल, हातातील अंगठी, चांदीचे कडे काढून घेऊन रिक्षातून चौघेही पळून गेले. घोडके यांनी याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात लूटमारीची तक्रार दिली आहे. रिक्षाचालक व लूटमारी करणाऱया तिघांचे पोलिसांनी वर्णन घेतले असून, त्या आधारे त्यांचा शोध घेतला जात आहे.
तर आजरा येथील रविंद्र आप्पासाहेब जाधव (वय 50 रा. हाजगोळी खुर्द ता. आजरा) यांचा मुलगा पृथ्वीराज हा पुणे येथे राहण्यास आहे. त्याच्याकडे जाण्यासाठी शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास रविंद्र जाधव हे कोल्हापूरात आले. मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील रिक्षा थांब्यासमोरील बोळामध्ये ते गेले असता त्यांना एका रिक्षाचालकाने बोलावून घेतले. रिक्षामध्ये बसलेल्या एका 25 वर्षीय तरुणाने चाकूचा धाक दाखवून रविंद्र जाधव यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडील मोबाईल पाकिट, असा सुमारे 6 हजारांचा मुद्देमाल चोरटÎाने लंपास केला. यानंतर तो चोरटा रिक्षामध्ये बसून पसार झाला. त्यानंतर रविंद्र जाधव यांनी याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
शाहूपुरी पोलीसांची गस्तच नाही
मध्यवर्ती बस स्थानक परिसरात लुटमारीच्या घटना वारंवार घडत असतात. मात्र काही नागरीक याची तक्रार दाखल करत नाही. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पथक या परिसरात गस्तच घालत नसल्याचा आरोप काही नागरीक, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी केला. पोलिसांनी मध्यवर्ती बस स्थानकासह परिसरात गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली.









