प्रतिनिधी/ बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानक परिसराचा विकास स्मार्टसिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. मात्र, फेरीवाल्यांना थांगपत्ता न लावता येथील साहित्य आणि हातगाडय़ा रातोरात हटविण्याची कारवाई करण्यात आली. यामुळे जय कर्नाटक संघटनेच्यावतीने महापालिका कार्यालयावर मोर्चा काढून फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याची मुभा देण्याच्या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांना देण्यात आले.
मध्यवर्ती बसस्थानक परिसर कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत येतो. पण येथील फेरीवाल्यांचे साहित्य सोमवारी रात्री महापालिकेच्या कर्मचाऱयांनी हटविले असल्याचा दावा करून संघटनेच्यावतीने महापालिकेवर मोर्चा काढून याचा जाब विचारला. या ठिकाणी फळ विपेते, ज्युस विपेते आणि विविध साहित्य विक्री करणाऱया फेरीवाल्यांच्या हातगाडय़ा होत्या. पण कोणतीच पूर्वसूचना न देता रातोरात हातगाडय़ा हटविण्याची कारवाई करण्यात आल्याने व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. 40 वर्षांपासून व्यवसाय करून कुटुंबांचा उदरनिर्वाह येथील फेरीवाले करतात. पण अचानकपणे सदर कारवाई महापालिकेच्या अधिकाऱयांनी केल्याने बेरोजगार होण्याची वेळ आली असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. स्मार्टसिटी योजनेंतर्गत विकासकामे राबविण्यात येत आहेत, ही बाब चांगली आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करून विकासकामे राबविणे अयोग्य आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर परिसर महापालिका हद्दीत येत नसल्याने मनपाने कोणतीच कारवाई केली नसल्याची माहिती निवेदन स्वीकारताना महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिली. सदर कारवाई महापालिकेच्या अधिकाऱयांनीच केली असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱयांनी केला. नव्याने दुकाने घालण्यासाठी मंजुरी देण्याची मागणी केली. त्यामुळे याबाबत चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.









