ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत राजीनामा दिलेल्या काँग्रेसच्या 16 आमदारांचे राजीनामे गुरुवारी रात्री मध्यप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष एनपी प्रजापती यांनी स्विकारले आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अल्पमतात आलेल्या कमलनाथ सरकारला शुक्रवारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. ज्योतिरादित्य शिंदेंसोबत 10 मार्चला काँग्रेसच्या 22 आमदारांनी बंडखोरी करत राजीनामे दिले होते. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र, त्यांच्या 16 आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी स्विकारले नव्हते. अखेर गुरुवारी रात्री त्यांचे राजीनामे स्विकारल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांनी केली.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश विधानसभेचे कामकाज 26 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्याने कमलनाथ सरकारला दिलासा मिळाला होता. मात्र, भाजप नेत्यांनी हा वाद सुप्रीम कोर्टात नेला. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने आज कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.