ऑनलाईन टीम / भोपाळ :
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मध्यप्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढवून त्यामध्ये कोरोनावरील उपचारांचाही समावेश केला आहे.
मध्यप्रदेश सरकारने राज्यातील 250 हून अधिक रुग्णालयांशी तीन महिन्यांचा करार करणार आहे. ज्याअंतर्गत कोणतेही रुग्णालय कोरोना उपचार घेण्यासाठी आयुष्मान कार्ड वापरू शकते आणि रुग्णालय ते नाकारू शकत नाही. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना ही जबाबदारी देण्यात येणार आहे.
मध्यप्रदेश सरकारने गुरुवारी 68 रुग्णालयांशी करार केला असून, उर्वरित रुग्णालयांशी करार आजपासून सुरू झाले आहेत. त्यांना 40 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त पॅकेज देण्यात येणार आहे. गरिबांना कोरोना उपचार घेण्यास कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून लवकरात लवकर रुग्णालयांशी करार करण्याचा आदेश मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.









