ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक तुलसी सिलावत आणि गोविंदसिंह राजपूत यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांना शपथ दिली.
मागील वर्षी 21 एप्रिल रोजी सिलावत आणि राजपूत यांचा चौहान यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. पण, आमदार नव्हते. त्यामुळे 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या 28 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीपूर्वी घटनात्मक जबाबदारीमुळे सहा महिने मंत्रिपद पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
नोव्हेंबरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत आपापल्या जागा जिंकून दोघेही आमदार झाले असून, त्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.









