ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशातील काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने मध्यप्रदेशात राजकीय भूकंप झाला आहे. सरकार वाचविण्यासाठी मध्यप्रदेशचे मुख्यंमत्री कमलनाथ यांनी सोमवारी रात्री उशीरा कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक बोलावून सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत.
मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे असे एकूण तीन गट आहेत. दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना आपापल्या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांनी बंडाचे निशाण फडकविल्याने काँगेसचे 17 आमदार बेंगळूरला आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकारवर टांगती तलवार आहे. दरम्यान, शिंदे यांची समजूत घालण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्वजिय सिंह यांच्याशी कमलनाथ यांनी याबाबत चर्चा केली आहे.
याविषयी कमलनाथ म्हणाले, जे लोक माफियाच्या मदतीने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना केव्हाही यशस्वी होऊ देणार नाही. मध्यप्रदेशातील जनतेचे प्रेम हीच माझी ताकद आहे. त्यामुळे सरकार पाडणे कोणालाही शक्य होणार नाही.
दरम्यान, राजकीय वातावरण तापल्याने भाजपनेही मध्यप्रदेशातील आमदारांची आज (मंगळवार) संध्याकाळी 6 वाजता बैठक बोलावली आहे.