ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशातील शिवराजसिंह चौहानांच्या मंत्रिमंडळाचा आज 29 दिवसांनंतर विस्तार झाला. भाजपचे नेते नरोत्तम मिश्रा यांच्यासह तुलसी सिलावट, कमल पटेल, गोविंदसिंह राजपूत, मीना सिंह यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली.राज्यभवनात राज्यपाल लालजी टंडन यांनी सर्व नवीन मंत्र्यांना शपथ दिली.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गृहमंत्री किंवा आरोग्यमंत्री नसल्यामुळे विरोधक शिवराजसिंह चौहान यांना लक्ष्य करीत होते. देशात लॉकडाऊन आहे आणि यावेळी कोणत्याही राजकीय कार्यक्रमास परवानगी दिली जात नाही. या सर्वांच्या दरम्यान आज चौहान यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला.
मध्यप्रदेश विधानसभेत एकूण 230 जागा आहेत. त्यानुसार मुख्यमंत्र्यांसह एकूण 35 आमदार सरकारमध्ये मंत्री होऊ शकतात. शिवराज यांच्या नव्या सरकारने सामाजिक समीकरण आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
अकरा मार्चला ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या 22 समर्थकांसह काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे कमलनाथ सरकारने बहुमत गमावले. बहुमत चाचणीपूर्वी त्यांनी राजीनामा दिल्याने शिवराजसिंह चौहान यांना चौथ्यांदा मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची संधी मिळाली.