उमेदवारी अर्जांच्या पहिल्या दिवशी तिघांचे अर्ज : मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शुक्रवारी पहिल्याच दिवशी तिघांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात माजी मंत्री गोविंद गावडे, मत्री नीलेश काब्राल आणि एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी ही माहिती दिली. त्यांच्या समवेत पोलीस महानिरीक्षक राजेश कुमार यांची उपस्थिती होती. राज्यात दि. 14 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून आचारसंहिता लागू झाल्यानंतर शुक्रवारपासून उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात भरारी पथके सक्रिय झाली आहेत. एकूण 81 भरारी पथके अखंड 24 तास कार्यरत राहणार आहेत, असे कुणाल यांनी सांगितले.
निवडणूक कार्यालयाने ’सी-व्हिजील’ ऍप कार्यरत केले असून त्याद्वारे कोणत्याही नागरिकास आपल्या तक्रारी, सूचना मांडता येणार असून हे ऍप कार्यरत झाल्यापासून आतापर्यंत प्रतिदिन 30 च्या सरासरीने एकूण 329 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील 219 ग्राह्य मानल्या गेल्या आहेत.
उमेदवारांच्या विरोधात तक्रारी
राज्यात कोरोना मार्गदर्शक तत्वे लागू असल्याने त्यासंबंधीही अनेक तक्रारी दाखल आहेत. त्यात बहुतेक ठिकाणी उमेदवार समर्थकांच्या गर्दीने प्रचार करत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. घरोघरी प्रचारादरम्यान केवळ पाच समर्थकांना बरोबर नेण्यास मुभा देण्यात आली आहे. अशावेळी एखाद्याच्या विरोधात तक्रार आल्यास निर्वाचन अधिकारी त्यांना कारणे दाखवा नोटीस देतात, असे कुणाल यांनी सांगितले.
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 1700 ताब्यात
राज्यात भयमुक्त वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडावी यासाठी पोलीस खात्यातर्फेही सर्व तयारी करण्यात आली आहे. त्यातून कोणतीही अप्रिय घटना घडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्याद्वारे आतापर्यंत गुन्हेगारी स्वरुपाच्या तक्रारीवरून 264 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्याशिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 1700 पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेण्यात आले आहेत. अबकारी खात्याच्या सहयोगाने राज्यभरात घातलेल्या धाडींच्या माध्यमातून कोटय़वधींचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच काही प्रमाणात रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहे.
संपूर्ण पोलीसदल निवडणूक कार्यात गुंतले असून सर्वत्र कठोर पहारा ठेऊन आहे. रोखड, भेटवस्तू, दागिने, आदींवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय बँक खात्यातूनही होणाऱया संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यात आले आहे.
सुमारे 1.98 कोटींचा मद्यसाठा, 4.39 लाख रोखड आणि 28.75 लाखांचे अमलीपदार्थ, त्याशिवाय सुमारे 2 लाख किंमतीचे दागिने, 10.54 लाखांच्या भेटवस्तू असा सुमारे 2.44 कोटी रुपये किंमतीचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे, अशी माहिती श्री. कुमार यांनी दिली.









