‘ड्राय डे’पूर्वीच्या दिवशी मद्यविक्री दुकानांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते. लॉकडाउनच्या घोषणेपूर्वी वाइन शॉप्सबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इतकेच नव्हे. तर लॉकडाउननंतर वाईनशॉप्स खुल्या झाल्यावर लोक मद्याच्या एका बाटलीसाठी धडपड करताना दिसून येत होते. पण, सोशल मीडियावर कोलकात्यातील एक छायाचित्र व्हायरल झाले आहे. या छायाचित्राने रांगा केवळ मद्यासाठी नव्हे तर पुस्तकांसाठीही लागू शकतात हे दाखवून दिले आहे. कोलकात्यात असे घडू शकते कारण तेथे वाचनसंस्कृतीचा मोठा वारसा चालत आला आहे.
11 ऑगस्ट रोजी दीप्तकिर्ती यांनी हे छायाचित्र ट्विटरवर प्रसारित केले होते. हे छायाचित्र कोलकात्यातील असून तेथील एका प्रकाशकाच्या दुकानाबाहेर लोक रांगेत दिसून आले. प्रत्येक शहरात मद्यासाठी रांगा लागतात. केवळ कोलकात्यात पुस्तकांसाठी रांग लागते असे त्यांनी नमूद केले आहे.
हे छायाचित्र ‘डे’ज पब्लिशिंग शॉपसमोरील आहे. या शॉपसमोर अनेक लोक स्वतःच्या पसंतीचे पुस्तक खरेदी करण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसून आले. प्रकाशकाने 11-15 ऑगस्टपर्यंत स्वतःच्या इन-स्टोअर-कॅटलॉगवर 50 टक्क्यांची सूट दिली असून त्यांनी त्याला ‘स्वातंत्र्यदिन बुक बाजार’ नाव दिले आहे.
सोशल मीडिया युजर्स कोलकात्यातील लोकांचे कौतुक करत आहेत. पुस्तके वाचण्याची संस्कृती अद्याप शहरात प्रचलित आहे यावर विश्वासच अनेकांना बसत नाही. ऑनलाईन पुस्तके मागविण्याऐवजी कोरोनाकाळात लांब रांगेत लोक का उभे राहिले असा प्रश्नही काही जणांनी उपस्थित केला आहे.









