नवी दिल्ली
लॉकडाऊनच्या कालावधीत ऑनलाईन मद्याची विक्री करण्यास मान्यता मिळावी यासाठी या उद्योगाशी कार्यरत असणाऱया संघटनेकडून वाणिज्य मंत्र्याना पत्र लिहून विनंती करण्यात आली आहे. बँडेड मद्याची विक्री न झाल्यामुळे राज्यांना महसूल कमाईत मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बंदच्या कालावधीत फक्त जीवनावश्यक साहित्यांची विक्री सुरु ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अन्य उद्योगधंदे बंद आहेत. यातच ऑनलाईन मद्य विक्री करण्यासाठी मागणी केली जात आहे. ही मागणी कनफेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहलिक बेव्हरेज कंपनीने (सीआयएबीसी) यांनी केली आहे. आमचे असे म्हणणे आहे, की कोरोना विषाणूचे संकट आल्याने विविध व्यवसाय बंद आहेत, परंतु मद्य व्यवसायातून मोठय़ा प्रमाणात राज्यांना महसूल प्राप्त होत असतो. त्यामुळे आम्ही पत्र लिहून मद्य विक्री ऑनलाईन घरगुती सेवा देण्याचा विचार करत असल्याचे सीआयएबीसीचे महासंचालक विनोद गिरी यांनी सदरच्या पत्राद्वारे सरकारला विनंती केली आहे.









