महामार्ग पोलीस व बोरगाव पोलिसांनी पाठलाग करून पकडले
प्रतिनिधी / नागठाणे
ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर वळसे (ता.सातारा) गावच्या हद्दीत सोमवारी सकाळी पुढे चाललेल्या पिकअप टेंपोला पाठीमागून कंटेनर ट्रकने धडक दिल्याने पिकअप मधील चौघे जखमी झाले. अपघातातनंतर पळून चाललेल्या कंटेनरचालकाला कराड महामार्ग पोलीस व बोरगाव पोलिसांनी पाठलाग करून पकडले. कंटेनरचालकाविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी महामार्गावर सातारा ते कराड जाणाऱ्या लेनवर वळसे गावच्याहद्दीत मद्यधुंद अवस्थेत कंटेनर घेऊन निघालेल्या चालकाने पुढे जात असलेल्या पिकअप टेंपोला पाठिमागून धडक दिली. यामध्ये पिकअप मधील चौघे जखमी झाले. अपघातानंतर कंटेनरचालकाने गाडीसह तेथून पलायन केले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी याची माहिती बोरगाव पोलिसांना देत जखमींना रुग्णवाहिकेने उपचारासाठी सातारा येथे पाठवले.
या अपघाताची माहिती मिळताच बोरगावचे हवालदार मनोहर सुर्वे, सुनील जाधव, बाळू लांडे, चालक धनंजय जाधव तसेच कराड महामार्ग पोलीस पथकाचे सहायक फौजदार बशीर मुल्ला व सिकंदर लांडगे यांनी या कंटेनर ट्रकचा पाठलाग केला. महामार्गावर वेडा वाकडा निघालेल्या या ट्रकला अतीत गावच्या हद्दीत अडविण्यात पोलिसांना यश आले. कंटेनरचालक विनायकुमार (वय.३०,रा.रसुलबार, कानपूर) हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळल्याने त्याची नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल करण्यात आली.त्यानंतर सायंकाळी त्याच्याविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.