ऑनलाईन टीम / मुंबई :
निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केल्याप्रकरणी जामिनावर सुटका झालेल्या सहा शिवसैनिकांना आज पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. कलम 452 (बेकायदा घरात घुसणे) आदी कलमान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड केल्यामुळे शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. दरम्यान, मदन शर्मा यांनी आज राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर पुन्हा त्या शिवसैनिकांना समतानगर पोलिसांनी अटक केली आहे.
कांदिवलीतील समतानगर भागात शुक्रवारी ही घटना घडली होती. या प्रकरणी शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुखांसह सहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना शनिवारी जामिनावर सोडण्यात आले होते. मात्र, त्या सहाही जणांना पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे.
मदन शर्मा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर, माध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केले आहे. मी आतापासून ‘भाजपा-आरएसएस’ सोबत आहे, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
दरम्यान, त्यांना आज कोर्टात हजर केले असता बोरिवली कोर्टाने सहाही जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.