सतीश सावंत यांचे मत : देवगड येथे शिवसेनेची जनजागृती सभा
प्रतिनिधी / देवगड:
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये आर्थिक सक्षम बनविण्याची ताकद आहे. ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा. या योजनेचा स्वतःसाठी लाभ घेतल्यानंतर आणखी 25 जणांसाठी ही योजना राबविण्याचा संकल्प करा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे केले.
येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये शिवसेनेच्यावतीने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जनजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जि. प. चे माजी अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर, मिलिंद साटम आदी उपस्थित होते.
योजनेत राज्य शासनाचा 40 टक्के वाटा
संग्राम प्रभूगांवकर यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली. ही योजना लोकांपर्यंत सक्षमपणे पोहोचविणे गरजेचे आहे. या योजनेत 51 योजना अंतर्भूत असून ही योजना आणण्यामध्ये खासदार विनायक राऊत यांचे मोठे योगदान आहे, असे त्यांनी सांगितले. ही योजना फक्त केंद्र शासनाची नसून महाराष्ट्र शासनाचा 40 टक्के वाटा आहे, असे हरी खोबरेकर यांनी सांगितले.
योजनेसाठी शिवसैनिकांनी काम करावे
संजय पडते म्हणाले, ही योजना तळागाळातील लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने काम केले पाहिजे. कार्यकर्त्यांनी संघटना वाढविणे व येणाऱया स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांमध्ये शिवसेनेला चांगले यश मिळवून देण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद दुखंडे यांनी तर आभार विलास साळसकर यांनी मानले.









