मुबलक मिळणारा बांगडा झालाय दुर्मिळ
प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेल्या महिन्यात समाधानकारक मासळी मिळाली होती, मात्र त्यानंतर बदलेल्या हवामानासह गोठवणाऱया वाऱयांमुळे मच्छीमार खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी धजावत नसल्याने मासळीचे दरही वधारले होत़े त्यातच जिल्हाभरात 3-4 दिवसापासून प्रचंड प्रमाणात पडणाऱया थंडीसह खोल समुद्रामध्ये वेगवान वारे वाहत असून बहुतांश नौका किनाऱयावर उभ्या असल्याचे चित्र मिरकरवाडा जेटीसह जिल्हाभरात दिसत आह़े एकूणच कोकण किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
गारठवून टाकणाऱया हवामानाचा परिणाम जिल्हाभरातील मत्स्य व्यवसायावर झाला आहे. बाजारामध्ये दाखल होणाऱया मासळीचे दर वधारल्यामुळे मत्स्य खवय्ये नाराज झाल्याचे दिसून येत आहेत. मासेमारी उत्पादनात मोठी घट होत आह़े पर्ससीननेट बंदीही आह़े तरीही समाधानकारक मासळी मिळत नसल्याने मच्छीमार मेटाकुटीस आला आह़े सागरी जलधीक्षेत्रात मुबलक प्रमाणात मिळणाऱया बांगडय़ाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तो 300 रुपये किलो तर पापलेट 700 ते 800 रुपये किलो, कोळंबी 300 ते 400 रुपये किलो, हलवा 700 रुपये इतका चढय़ा भावामध्ये विक्री केला जात आह़े चढय़ा भावामुळे मत्स्य खवय्यांची पावले चिकन घेण्याकडे वळत असल्याचे चित्र आह़े
लहरी हवामान, मत्स्य दुष्काळ यांमुळे मुबलक मासळी मिळत नसल्यामुळे मच्छीमाराला नेहमीच डिझेल, खलाशांचा खर्चही सुटत नाही. त्यामुळे काही मच्छीमारांनी नौका बंदरावर उभ्या ठेवून खलाशांना माघारी पाठवले आह़े यातच परप्रांतीय केरळ, तामिळनाडू येथील अनधिकृत नौका महाराष्ट्राच्या जलधीक्षेत्रामधील मासळी पकडत असल्याचे मच्छीमार सांगत आह़े यावर कडक कारवाईची मागणी मच्छीमार संघटनांकडून करण्यात येत आह़े
मासळीचा दर वधारणार
मासळी मिळण्याचे नैसर्गिक प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे मच्छीमारांचे हाल होत आहेत. यामुळे मासळीचा दर वधारणार आहे. हवामानातील बदल, गारठवून टाकणाऱया थंडीमुळे बहुतांश नौका बंदरामध्येच उभ्या आहेत़









