शिरगाव मत्स्य महाविद्यालयात गिरवले धडे : नंदूरबारमध्येही बजावलीय सेवा
महेंद्र पराडकर / मालवण:
मासेमारीतील पारंपरिक आणि पर्ससीन नेट वाद. त्याचप्रमाणे परराज्यातील अवाढव्य हायस्पीड ट्रॉलर्सविरोधात वारंवार पडणारी संघर्षाची ठिणगी. अशा तणावपूर्ण वातावरणात मालवणातील सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयात अधिकारीपदाची जबाबदारी खांद्यावर घेणे हे एक मोठे आव्हानच. मात्र अशा स्फोटक परिस्थितीला अतिशय शांतपणे सामोरे जात मालवणच्या मत्स्य कार्यालयाचा डोलारा सांभाळणाऱया पंचवीशीतल्या तिघींचे सर्वांनाच कौतुक वाटते.
गेल्या दहा वर्षांत मत्स्य व्यवसायात अत्यंत संघर्षमय वातावरण आहे. जिल्हय़ाचे प्रमुख कार्यालय मालवणलाच आहे. ’छोटे मच्छीमार आणि मोठे मच्छीमार’ यांच्यातील संघर्षाचे केंद्रबिंदूही मालवणच आहे. शिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतही मध्यंतरी काही मत्स्य अधिकारी रंगेहाथ पकडले गेले होते. अशा परिस्थितीत अधिकारी म्हणून आपली सुरुवातीची काही वर्षे मालवणात सेवा बजावण्याची धमक या मुली दाखवतात आणि बऱयापैकी टीकाव धरतात, ही कामगिरी सर्वांनाच उल्लेखनीय वाटते. अनधिकृत मासेमारीमुळे येणाऱया तक्रारी तसेच निर्माण होणारे तंटे या साऱयांना सामोरे जात अन्य कार्यालयीन कामकाज हातावेगळे करण्याचे दुहेरी कौशल्य अंगी असावे लागते. मच्छीमारांचे मोबाईल कॉल अटेंड करून त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करणे, वरिष्ठांचे दूरध्वनी उचलून कार्यालयीन कामकाम अपडेट ठेवणे, कार्यालयातील नियमित कामकाजही तत्परतेने कसे पूर्ण करता येईल याकडे लक्ष देणे, वादळवाऱयांचे संदेश मच्छीमारांपर्यंत पोहोचविणे, समुद्रातील परिस्थतीवर लक्ष ठेवणे, अशा विविध जबाबदाऱया त्यांना अन्य अधिकाऱयांसमवेत सांभाळाव्या लागत आहेत. म्हणूनच मालवणच्या मत्स्य कार्यालयात आज ‘फिशरीजच्या मॅडमां’चा दबदबा आहे.
कशा बनल्या मत्स्य अधिकारी?
मालवण भरड येथील तेजस्विता करंगुटकर हय़ा सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी पदावर सध्या कार्यरत आहेत. तत्पूर्वी 2018-19 या कालावधीत त्या मालवणहून 780 कि. मी. दूर असलेल्या नंदुरबार जिल्हय़ात ाहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी पदावर कार्यरत होत्या. त्यांचे पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण मालवणवच्या भंडारी हायस्कूलमध्ये झाले. भंडारी हायस्कूलमध्ये बारावी विज्ञान शाखेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी 2012-16 मध्ये रत्नागिरी जिल्हय़ातील मत्स्य महाविद्यालयात ‘बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स’चा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर 2018 मध्ये त्यांनी ‘मास्टर्स इन फिश प्रोसेस टेक्नॉलॉजी’ ही पदवी मिळवली. कुडाळ तालुक्यातील नानेली सुतारवाडी येथील रहिवासी असलेल्या श्रुतिका गावडे हय़ा सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांचे पहिले ते बारावीपर्यंतचे शिक्षण श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय माणगाव येथे झाले. त्यांनी ‘बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स’ची पदवी 2018 मध्ये †िमळवलीय. तर तिसऱया अधिकारी अस्लेषा गोळवणकर या रत्नागिरीतील थिबा पॅलेस रोड येथील रहिवासी आहेत. रत्नागिरीतील गंगाधर गोविंद पटवर्धन इंंग्लिश मीडियम स्कूल आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय येथे त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. 2016 मध्ये त्यांनी ‘बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स’ची पदवा मिळविली. या तिघी भविष्यात सहाय्यक आयुक्त पदासाठीची परीक्षा देण्याचीही तयारी करीत आहेत.
मच्छीमार कुटुंबाना मिळतेय प्रेरणा
दांडी येथे यावर्षी 11 फेबुवारी रोजी मत्स्य दुष्काळ परिषदेचे आयोजत करण्यात आले होते. या परिषदेस मच्छीमार व लोकप्रतिनिधींना सामोरे जाण्याची जबाबदारी मत्स्य विभागाकडून तेजस्विता करंगुटकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. त्यांनी हे आव्हान बऱयापैकी पेलले होते. परिषद संपल्यावर उपस्थित मच्छीमार महिलांनी त्यांच्याविषयी विचारपूस करीत ‘मत्स्य अधिकारी’ होण्यासाठी काय केले पाहिजे? याची माहिती घेतली. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मालवणातील मच्छीमार कुटुंबातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी करिअरसाठी शिरगाव मत्स्य महाविद्यालयाचा मार्ग स्वीकारायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात मत्स्य विभागात मच्छीमार कुटुंबातील विद्यार्थी अधिकारी म्हणून पाहायला मिळाले, तर नवल वाटायला नको.









