प्रतिनिधी/ रत्नागिरी
किनारपट्टीवर पहाटेच्या सुमारास वाहणाऱया मतलई वाऱयांमुळे मच्छीमारांनी किनाऱयावर राहणे पसंत केले आह़े वेगवान वाऱयासह पाण्याला करंटही असल्याने अनेक नौका बंदरातच उभ्या करण्यात आल्या आहेत़ तसेच डॉल्फिन, जेलिफीश या माशांच्या उपद्रवाला मच्छीमारांना समोर जावे लागत आह़े परिणामी मासळीचे दर वधारले आहेत़
गेले काही दिवस मच्छीमारांना समाधानकारकरित्या मासळी मिळत होत़ी या हंगामामध्ये तवर, पापलेट, सरंगा यासांरखी किंमती मासळी मिळत होत़ी मात्र अखेरच्या टप्प्यामध्ये मतलई वाऱयांमुळे मासेमारी करण्यास अडथळा ठरत आह़े गेल्या दोन-तीन दिवसापासून मतलई वारे सुरू झाले आहेत. पहाटेच्या सुमारास वारे वाहत असल्यामुळे दुपारपर्यंत पाणी अस्थिर राहत़े त्यामुळे खोल समुद्रात जाऊनही मच्छीमारांच्या हाती मासळी मिळत नसल्याचे मच्छीमारांनी सांगितल़े त्यामुळे काही मच्छीमारांनी नौका बंदरातच उभ्या केल्या आहेत़ मच्छीमारांना मांदेली, छोटी बांगडी सापडत असून त्याचे दर वधारले आहेत़ बांगडय़ाचा दर 120 रूपये किलोवरून 150 ते 200 पर्यंत वधारला आह़े
गिलनेटद्वारे मासेमारी करणाऱया मच्छीमारांना प्रतिकुल हवामानाचा फटका बसला आह़े मतलई वारे व पाण्याला आलेल्या करंटमुळे जेलिफीश, डॉल्फीन किनाऱयाकडे वळतात़ या दोन्ही माशांमुळे जाळी फाटतात व नुकसान होते. जाळ्यांमध्ये सापडलेली मासळी हे मासे खातात़ सध्या किनारपट्टीवर डॉल्फीन झुंडीच्या झुंडीने फिरत असल्याचे दिसून येत आह़े या दोन्ही माशांच्या उपद्रवामुळे मच्छीमारांचे आर्थिक नुकसान होत आह़े









