बेळगाव : बुधवारी अचानक मनपा निवडणुकीची घोषणा झाल्याने इच्छुकांनी मनपा कार्यालयात धाव घेतली. मागील अडीच वर्षांपासून मनपाकडे पाठ फिरविलेल्या माजी नगरसेवकांसह काही इच्छुकांनी गुरुवारी सकाळी मनपा कार्यालयात येऊन निवडणुकीची माहिती जाणून घेतली. काहींनी मतदारयादीसाठी आणि उमेदवारी अर्जाची विचारणा केली. त्यामुळे मनपा कार्यालयात इच्छुकांची गर्दी झाली होती.
महापालिका लोकनियुक्त सभागृहाची मुदत संपून अडीच वर्षे उलटली. पण वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने निवडणुकीची घोषणा झाली नव्हती. धारवाड उच्च न्यायालयातील याचिकेचा निकाल लागल्यानंतरच निवडणुकीची घोषणा होणार असा समज होता. मात्र, अचानकपणे निवडणूक जाहीर झाल्यामुळे सर्व इच्छुक खडबडून जागे झाले आहेत. महापालिकेची वॉर्ड पुनर्रचना 2018 मध्ये करण्यात आली होती. पण ही वॉर्ड रचना चुकीच्या पद्धतीने असल्याची तक्रार करून उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेत सरकारच्यावतीने प्रतिज्ञापत्र दाखल करून नव्याने वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. पण बेंगळूर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केवळ वॉर्ड आरक्षणामध्ये बदल करून मतदारयाद्या तयार करण्यात आल्या होत्या. पण बेंगळूर उच्च न्यायालयाच्या निकालाचा फेरविचार व्हावा, अशी याचिका जानेवारी 2021 मध्ये दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेची सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. मात्र, धारवाड खंडपीठाच्या उच्च न्यायालयाने निकाल देण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेची निवडणूक जाहीर केली आहे.
न्यायालयातील याचिकेचा निकाल लागल्यानंतर निवडणूक जाहीर होईल, अशा समजुतीने इच्छुक बिनधास्त होते. कोरोना कालावधीत निवडणुका होणार नाहीत, अशी घोषणादेखील राज्य शासनाने केली होती. पण बुधवारी निवडणुकीची घोषणा झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गुरुवारी सकाळी माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी महापालिका कार्यालयाकडे धाव घेऊन मतदारयादीच्या प्रतिसाठी अर्ज केला. काहींनी उमेदवारी अर्जाची विचारणा करून उमेदवारी अर्जासोबत लागणाऱया कागदपत्रांच्या यादीची मागणी केली. त्यामुळे मनपा कार्यालयात इच्छुकांची गर्दी झाली होती. कोणतीच तयारी नसताना निवडणूक अचानक जाहीर झाल्याने अधिकाऱयांची धावपळ सुरू होती. अशातच विविध माहितीकरिता इच्छुकांची कौन्सिल विभागात गर्दी झाल्याने अधिकाऱयांची डोकेदुखी वाढली.









