मनपा निवडणूक पार्श्वभूमीवर वॉर्डस्तरीय मतदारयादी तयार करण्याचा आदेश : महापालिका प्रशासनासमोर संभ्रम : काम 14 दिवसात पूर्ण करण्याची सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने क्लोजडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. एकीकडे कोराना नियमावलीची अंमलबजावणी, दुसरीकडे क्वॉरंटाईनचे काम अशातच काही कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाली आहे. तरीदेखील निवडणूक आयोगाने वॉर्डस्तरीय मतदारयादी तयार करण्याचा आदेश बजावला आहे. इतकेच नव्हे अवघ्या 14 दिवसात काम पूर्ण करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे मनपा कर्मचारी अडचणीत आले आहेत.
शहरात कोराना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोरोना नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱयांना जुंपण्यात आले आहे. अशातच मनपाच्या सात कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राज्य शासनाने क्लोजडाऊनची घोषणा केली आहे. मात्र, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्डस्तरीय मतदारयादी तयार करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने बजावला असल्याने मनपा प्रशासन अडचणीत आले आहे. शहरात क्लोजडाऊन करण्यात आले असल्याने सर्व वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच संचारबंदी राहणार असून कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मतदारयादी तयार करण्यासाठी मनपा कर्मचाऱयांची आवश्यकता भासणार आहे. पण कोरोना नियमावलीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मनपा कर्मचाऱयांवर सोपविण्यात आली आहे. तसेच कोरोना बाधितांच्या संपर्कात येणाऱया नागरिकांना व कुटुंबातील सदस्यांना होम क्वॉरंटाईन करून त्याबाबतची माहिती दररोज ऍपद्वारे अपलोड करण्याची सूचना करण्यात आली आहे. मनपा कार्यालयातील सात कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे वॉर्डस्तरीय मतदारयादी कशी तयार करायची असा प्रश्न मनपा अधिकाऱयांसमोर निर्माण झाला आहे.
महापालिका वॉर्डची पुनर्रचना झाली असून याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र राज्य शासनाने वॉर्ड आरक्षण जाहीर करून अंतिम केली आहे. आता राज्य निवडणूक आयोगाने वॉर्डस्तरीय मतदारयादी, मतदान केंदे आदी तयारी करण्याचा आदेश महापालिका प्रशासनाला बजावला आहे. राज्यात कोरोनामुळे राज्य शासनाने क्लोजडाऊन करण्याची घोषणा केली आहे. सर्व निवडणुका लांबणीवर टाकण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा यांनी केली आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाने मनपा निवडणूक घेण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनासमोर संभ्रम निर्माण झाला आहे. वॉर्डस्तरीय मतदारयादी तयार करण्यासाठी 5 मे पर्यंत मुदत देण्यात आली असून दि. 10 पर्यंत मतदारयादी प्रसिद्ध करण्याची सूचना करण्यात आली आहे. पण नव्याने वॉर्ड पुनर्रचना करण्यात आल्याने आराखडा तयार करून त्यानुसार मतदारयादी तयार करणे आवश्यक आहे. वॉर्डच्या हद्दीनुसार प्रत्यक्ष पाहणी करून मतदारयादी तयार करावी लागणार आहे. याकरिता पाहणी करण्यासाठी मनपा प्रशासनाच्या अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना शहरात फिरावे लागणार आहे. पण हे काम निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीत पूर्ण होणे अशक्मय आहे. मतदारयादी तयार करण्यासाठी बीएलओंची मदत घ्यावी लागते. पण क्लोजडाऊन करण्यात येणार असल्याने बीएलओद्वारा मतदारयादी कशी करायची, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
वेळ मागून घेण्याची तयारी
त्यामुळे मतदारयादी तयार करण्याचे काम करण्यासाठी मुदत देण्याची मागणी महापालिकेकडून करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सध्या शहरात निर्माण झालेली परिस्थिती आणि मनपा कार्यालयातील कर्मचाऱयांवर सोपविण्यात आलेल्या कामांची जबाबदारी तसेच कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती देऊन मतदारयादी तयार करण्यासाठी वेळ मागून घेण्यासाठी जिल्हाधिकारी व राज्य निवडणूक आयोगाला पत्र देण्याची तयारी महापालिकेने चालविली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









