जोरदार पाऊस झाल्यास पाणी साचण्याचा धोका, आवश्यक खबरदारीसाठी मनपाची धावपळ
प्रतिनिधी / बेळगाव
लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने जोरदार तयारी चालविली आहे. बे. के. मॉडेल शाळेच्या मैदानावर मतदान यंत्रे वितरित करण्यात येणार आहेत. मात्र वळीव पावसामुळे मैदानावर पाणी साचून चिखल झाला आहे. जोराचा पाऊस झाल्यास मैदानावर पाणी साचण्याची धास्तीही निर्माण झाली आहे.
मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेने दक्षिण आणि उत्तर मतदारसंघातील 676 मतदान केंद्रांकरिता 6300 कर्मचाऱयांनी नियुक्ती केली आहे. सर्व कर्मचाऱयांना बी. के. मॉडेल येथील स्ट्रॉगरूममधून शुक्रवार दि. 16 रोजी इव्हीम मशीन देण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी मशीन घेतल्यानंतर नियुक्त केलेल्या कर्मचाऱयांना बसद्वारे मतदान केंद्रावर जावे लागणार आहे. तसेच दि. 17 रोजी मतदान झाल्यानंतर रात्री पुन्हा याच ठिकाणी मतदान यंत्रे जमा करून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे बी. के. मॉडेल शाळेच्या मैदानावर भव्य अशी मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱयांसाठी मैदानात थांबण्यासाठी तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदान यंत्रे व निवडणूक साहित्य घेण्यासाठी येणाऱया अधिकारी आणि कर्मचाऱयांची गर्दी होणार असल्याने भव्य मैदानात सुविधा करण्यात आली आहे. मात्र याठिकाणी मैदानात पावसाचे पाणी साचत असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. सध्या वळीव पावसाचा मारा दररोज दुपारनंतर होत असून बुधवारी दुपारी झालेल्या पावसामुळे बी. के. मॉडेल शाळेच्या मैदानावर पाणी साचल्याने मंडपामध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे पाणी साचू नये याकरिता महापालिकेच्या अधिकाऱयांनी माती घालून पाणी बाहेर काढण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे काम हाती घेतले होते.
शनिवार दि. 17 रोजी होणाऱया मतदान प्रक्रियेकरिता शुक्रवारी मतयंत्रे वितरित करण्यात येणार आहेत. त्या दरम्यान पाऊस आल्यास मैदानात पाणी साचू नये यासाठी चरी खोदून पाणी खड्डय़ात साचविण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच चिखल होऊ नये, याकरिता मैदानावर रोडरोलर फिरवण्यात आला. मात्र जोरदार पाऊस झाल्यास मैदानावर पाणी साचण्याचा धोका असल्याने महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱयांसमोर पेच निर्माण झाला आहे.









