ईव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत जागृती, प्रवाशांसमोर प्रात्यक्षिक सादर
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हा निवडणूक आयोगामार्फत आगामी निवडणुकांकरिता वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राबाबत शनिवारी बसस्थानकात जनजागृती करण्यात आली. जिल्हाधिकारी नितेश पाटील व जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर यांच्या हस्ते या जागृती मोहिमेला प्रारंभ झाला.
इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशिनबाबत (ईव्हीएम)जनतेत विश्वास निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. यासाठी शहरातील विविध भागात मतदान यंत्राबाबत जागृती केली जात आहे. हजारो प्रवाशांनी गजबजणाऱ्या बसस्थानकात शनिवारी प्रात्यक्षिके सादर करून ईव्हीएमबाबत प्रवाशांमध्ये जागृती करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, निवडणुकीला मतदारांनी विश्वासाने सामोरे गेले पाहिजेत. शिवाय इलेक्ट्रॉनिक व्होटिंग यंत्राबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी मतदान यंत्राबाबत जागृती केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने मतदान यंत्राबाबत आक्षेप घेतला जावू नये, यासाठी जागृतीच्या कामाला गती दिली आहे. शहरातील बसस्थानक आणि इतर गर्दीच्या ठिकाणी मतदारांना ईव्हीएम यंत्राबाबत जागृती केली जात आहे.
याचबरोबर फिरत्या वाहनात बसविलेल्या चित्रफितीद्वारे जागृतीचे काम हाती घेण्यात आले आहे. बसस्थानकात फिरते वाहन थांबवून जागृती करण्यात आली. यावेळी केएसआरटीसीचे अधिकारी, चालक, वाहक व प्रवासी उपस्थित होते.









