415 निवडणूक केंद्रांमध्ये होणार मतदान, 415 अधिकाऱयांची नियुक्ती
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव महापालिकेची निवडणूक शुक्रवार दि. 3 रोजी होत असून मतदानाची सर्व तयारी झाली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात 415 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून 415 पीआरओसह दोन हजार कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे.
58 वॉर्डांमधून 385 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये तीनहून अधिक उमेदवार असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार रिंगणात असून मराठी भाषिक उमेदवारदेखील निवडणूक लढवित आहेत. संपूर्ण शहरात 4 लाख 30 हजार 825 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी 2 लाख 14 हजार 848 पुरूष मतदार तर 2 लाख 15 हजार 977 महिला मतदारांचा समावेश आहे. शहरात 402 मतदान केंदे करण्यात आली होती.
मात्र काही मतदान केंद्रांमध्ये 1 हजारहून अधिक मतदार असल्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढविली आहे. कोरोना नियमावलीनुसार 1 हजारहून अधिक मतदार असल्यास केंद्रांची स्थापना करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार 13 मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे 415 मतदान केंद्रांवर मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
यंदाच्या निवडणुकीत एकही उमेदवार बिनविरोध झाला नाही. त्यामुळे सर्व 58 जागांसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणेने 415 मतदान केंद्रे सज्ज केली आहेत. प्रत्येक केंद्रात एक प्रिसायडिंग ऑफिसर याप्रमाणे 415 अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 20 अधिकारी राखीव ठेवण्यात आले आहेत. याचप्रमाणे प्रिसायडिंग ऑफिसरच्या हाताखाली तीन साहाय्यक आधिकारी देण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या दिमतीला एक शिपाई तैनात करण्यात आला आहे. अनुचित प्रकार घडू नये याकरिता प्रत्येक केंद्रावर एक पोलीस कॉन्स्टेबलची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच संवेदनशील केंद्रावर पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मतदानासाठी आवश्यक साहित्य रवाना
मतदान शुक्रवारी असल्याने मतदानासाठी आवश्यक साहित्य गुरुवारी रवाना करण्यात आले. यावेळी मतदान प्रक्रिया मतपेटय़ांऐवजी इलेक्टानिक यंत्राद्वारे होणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी आवश्यक असलेली सामग्री गुरुवारी बी. के. मॉडेल शाळेमधून निवडणूक अधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आली. खानापूर आणि बेळगाव तालुक्मयातील अधिकाऱयांची नियुक्ती निवडणुकीसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी बी. के. मॉडेल शाळेच्या आवारात सर्व अधिकारी दाखल झाले होते. त्या ठिकाणी अधिकाऱयांना मतदान यंत्रांची माहिती देवून सर्व सामग्री देण्यात आली. त्यामुळे बी. के. मॉडेल शाळेच्या आवारात गर्दी झाली होती.









