तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरीत आज एकाच दिवशी मतदान- सकाळी 7 ला प्रारंभ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आसाममध्ये तिसऱया आणि शेवटच्या टप्प्याचे, पश्चिम बंगालमध्ये तिसऱया टप्प्याचे, तर पुदुच्चेरी, केरळ आणि तामिळनाडूत पूर्ण मतदान आज मंगळवारी होत आहे. मतदानाची वेळ सर्वत्र सकाळी 7 ते संध्याकाळी 6 qqqवाजेपर्यंत आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात कोणतीही अडचण येऊ नये, अशा पद्धतीने सर्व व्यवस्था करण्यात आली आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
या तिसऱया टप्प्यानंतर आसाम, पुदुच्चेरी, केरळ आणि तामिळनाडू येथे मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर केवळ पश्चिम बंगालमध्ये पुढच्या आणखी पाच टप्प्यांमध्ये मतदान होईल. 29 एप्रिलला सर्व मतदान पूर्ण झाल्यानंतर 2 मे यादिवशी मतगणना असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत.
आसाममध्ये सज्जता पूर्ण
आसामच्या 126 मतदारसंघांपैकी तिसऱया आणि शेवटच्या टप्प्यात 40 जागा आहेत. या जागांमध्ये एकंदर 337 उमेदवार त्यांचे भवितव्य आजमावून पहात आहेत. सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ मंत्री हिमांत बिस्व शर्मा यांच्यासह पाच मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रणजीत कुमार दास यांचा उमेदवारांमध्ये समावेश आहे.
दुहेरी-तिहेरी लढती
40 पैकी 20 मतदारसंघांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँगेस आघाडीत 20 जागांवर थेट लढत आहे. तर उरलेल्या जागी तिहेरी लढती आहेत. नवा पक्ष एजेपी हा 22 जागांवर लढत आहे. उमेदवारांमध्ये 25 महिलांचाही समावेश आहे. एकंदर 12 जिल्हय़ांचा निवडणूक प्रक्रियेत समावेश आहे.
पश्चिम बंगालमध्ये 31 जागा
तिसऱया टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 31 जागा आहेत. 78.5 लाख मतदार असून अनेक दिग्गज नेते मैदानात आहेत. सर्व मतदारसंघांमध्ये तिहेरी लढत होईल असे अनुमान आहे. भाजपचे स्वपन दासगुप्ता, तृणमूलचे मंत्री अशिमा पात्रा आणि मार्क्सवादी नेते कांती गांगुली यांचा उमेदवारांमध्ये समावेश आहे. हावडा, हुगळी आणि दक्षिण 24 परगाणा या तीन जिल्हय़ांमध्ये या 31 जागा आहेत.
चोख सुरक्षा व्यवस्था
सर्व मतदारसंघांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. केंद्रीय राखीव दलांच्या 618 तुकडय़ा सज्ज आहेत. 10 हजार 871 मतदान केंद्रे असून सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आहेत. मतकेंद्र अधिकारी त्यांच्या स्थानी पोहचले असून सर्व सज्जता पूर्ण करण्यात आली आहे.
पुदुच्चेरी, तामिळनाडू, केरळ
पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश असून तेथे 30 जागा आहेत. केरळमध्ये 140 जागा असून तामिळनाडूत त्यांची संख्या 234 आहे. या सर्व जागांवर आज मंगळवारी एकाच दिवशी मतदान होत आहे. पुदुच्चेरीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँगेस आघाडीत थेट लढत आहे. तर केरळमध्ये सत्ताधारी डाव्या आघाडीला काँगेस आघाडी विरोध करीत आहे. तामिळनाडूत पारंपरिक प्रतिस्पर्धी अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांच्यात लढत आहे. केरळमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याचा प्रघात गेल्या 40 वर्षांपासून आहे. यंदा काय होणार याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे. सर्वच प्रदेशांमध्ये निवडणूक चुरशीची होईल, असे अनुमान आहे.
सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सर्व प्रदेशांमध्ये भाजप, काँगेस, तृणमूल काँगेस, डावे पक्ष, द्रमुक, अद्रमुक आदी पक्षांनी जोरदार प्रचाराची राळ उडवून दिली होती. भाजपसाठी पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अनेक केंद्रीय मंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, तर काँगेससाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी, तृणमूलसाठी ममता बॅनर्जी, द्रमुकसाठी स्टॅलिन करुणानिधी, अद्रमुकसाठी मुख्यमंत्री पलानीस्वामी, डाव्यांसाठी पी. विजयन इत्यादी नेत्यांनी प्रचारधुमाळीत भाग घेतला.









