वार्ताहर/ हिंडलगा
घराला अचानक लागलेल्या आगीत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी (दि. 6) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मण्णूरमध्ये घडली. सुदैवानेच यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, आगीत संसारोपयोगी साहित्य व घराचे मोठे नुकसान झाले आहे.
जोतिबा परशराम शहापूरकर रा. लक्ष्मी गल्ली, मण्णूर यांच्या देवघरात ही आगीची दुर्घटना घडली आहे. याबाबत शहापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जोतिबा यांनी जुन्या घराच्या मागील बाजुला आपले नवीन घर बांधले आहे. तर समोरील घरात देवघर व इतर साहित्ये ठेवण्यासाठी वापर केला जातो. सोमवारी (दि. 6) पहाटे सर्वजण गाढ झोपेत असताना पाच वाजण्याच्या सुमारास अचानक देवघरात आग लागली. यावेळी धुराचे लोळ उडू लागल्याने शेजाऱयांनी आरडाओरड करताच सर्वांनी धाव घेत पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण, देवघरातील संपूर्ण छताला आग लागल्याने पाणी अपुरे पडू लागले. त्यामुळे लागलीच अग्नीशमन दलाला कळविण्यात आले. त्यानंतर कांही वेळातच दोन बंबासह दाखल झालेल्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन आग विझविली. तोपर्यंत घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, देवघरातील साहित्य व संपूर्ण वायरिंग जळून खाक झाले आहे. पण आग शॉर्टसर्किटने की अन्य कोणत्या कारणाने लागली, याचे कारण समजू शकले नाही..









