आंबेवाडी ग्राम पंचायतीविरोधात संताप; वाहतूक खोळंबली : वेतन कमी जमा केल्याने कर्मचारी संतप्त
वार्ताहर /हिंडलगा
ठरावीक वेतनापेक्षा कमी वेतन खात्यात जमा केल्याने आंबेवाडी ग्राम पंचायतीवर संतापलेल्या रोजगार हमी योजनेतील कर्मचाऱयांनी बुधवारी (दि. 5) मण्णूर-गोजगे मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे सुमारे तीन तास रस्त्यावरील वाहतूक खोळंबल्याने वाहनधारकांचे हाल झाले.
याबाबत कर्मचाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनामार्फत ग्राम पंचायतीमधील रोहयो कर्मचाऱयांना दिवसाकाठी 290 रुपये वेतन दिले जाते. पण, आंबेवाडी ग्राम पंचायत आणि अभियंत्यांच्या गलथान कारभारामुळे शेकडो कर्मचाऱयांचे मागील काही आठवडय़ांचे वेतन ठरावीक वेतनापेक्षा कमी जमा करण्यात आले आहे. याबाबत मण्णूर येथील कर्मचाऱयांना माहिती मिळताच ग्राम पंचायत अधिकारी व सदस्यांना जाब विचारण्यात आला. पण, समर्पक उत्तर न मिळाल्याने संतप्त बनलेल्या कर्मचाऱयांनी थेट काम बंद करून मण्णूर-गोजगे रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी ‘रोजगार आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘मनमानी कारभार करणाऱया अधिकाऱयांची बदली करा’ अशा घोषणा कर्मचाऱयांनी देत परिसर दणाणून सोडला होता. शेकडो कर्मचाऱयांनी अचानक आंदोलन केल्याने सुमारे तीन तास रस्त्यावरील वाहतूक बंद पडली होती. त्यामुळे वाहनधारकांना इतर रस्त्यांना वळसा घालून प्रवास करावा लागल्याने हाल झाले. त्यानंतर दाखल झालेले ग्राम पंचायत अध्यक्ष चेतन पाटील, पीडीओ सुमित्रा गाणगेर व इतर सदस्यांनी कर्मचाऱयांची समजूत काढून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पण संपूर्ण वेतन जमा केल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, या निश्चयावर ठाम राहिल्याने काकती पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी पोलिसांनीदेखील आंदोलन मागे घेण्यास सांगितले. त्यानतंर अधिकाऱयांशी चर्चा करून योग्य ते वेतन जमा करण्याचे आश्वासन दिल्याने तूर्तास आंदोलन मागे घेण्यात आले. पण, फरक वेतन जमा न केल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त कर्मचाऱयांनी दिला आहे.









