मणेराजूरी / वार्ताहर
मणेराजूरीतील ज्यु कॉलेजच्या युवकांच्या वादातून चाकूने पोटात भोसकलेल्या अक्षय बाबासो चव्हाण (वय 18 ) या कॉलेज युवकाचा शुक्रवारी रात्री अतिरक्तस्त्रावामुळे उपचार सुरु असताना मूत्यू झाला असून यामुळे मणेराजूरीत तणावाचे वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवणेत आला आहे, याप्रकरणी तिघांना तासगाव पोलीसांनी जेरबंद करुन त्यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल करणेत आला आहे, शाळेतील विदयार्थ्यांचा वाद खुनापर्यंत गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान मयत अक्षय चव्हाण वर शनिवारी पहाटे तणावपूर्ण वातावरणात अत्यंसंस्कार करणेत आले.
महावीर पांडूरंग साळुंखे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीत शिकणाऱ्या या विदयार्थ्यांचे एक महिन्यापूर्वी झालेले भांडण “खून ” करण्यापर्यंत टोकाला गेल्याने ग्रामस्थ व पालकांच्या मध्ये एकच खळबळ उडाली आहे . नक्की कोणते भांडणाचे कारण ? की अन्य ? कारणासाठी खून झाला हे पोलीस तपासात पुढे येण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हायस्कुल शाळेच्या बाजूस असणाऱ्या अरूंद रस्त्यावर ही घटना घडली होती, याबाबत घटनास्थळ व तासगांव पोलीसांच्याकडून समजलेली माहिती अशी की, मयत अक्षय चव्हाण व इतर हल्ला करणारे आरोपीच्या मध्ये काही महिन्यांपूर्वी पासून वाद होत होता.
त्यातूनच हा प्रकार घडला आहे. असा प्राथमिक अंदाज आहे. अटक केलेल्या तिघांच्या तपासातून कोणत्या कारणासाठी खून केला ही माहिती पुढे येण्याची शक्यता आहे, शुक्रवारी सकाळी हायस्कूलच्या बाजूस असणाऱ्या अरुंद रस्त्यावर या विदयार्थ्यांच्यामध्ये वाद सुरु झाला यातूनच एकाने अक्षय याच्या पोटावर धारदार चाकूने जोराचा वार केला व त्याला रक्तबंबाळ अवस्थेत तेथेच टाकून आरोपी पळाले होते. अक्षय जखमी झाल्याने तातडीने त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करणेत आले होते. या घटनेची वर्दी पोलीस पाटील दिपक तेली यांनी तासगांव पोलीसात दिली होती. तर अविनाश चव्हाण यांनी फिर्याद दिली होती, घटनास्थळी पोलीस उपअधिक्षका अश्विनी शेंडगे यांनी भेट देवून तपासाच्या सूचना दिल्या होत्या .
या घटनेचे गांभीर्य ओळखून तासगांव पोलीसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला, यावेळी पोलिस अधिकारी नितीन कोराम ,व्ही .एस. मोहीते ,हणमंत गवळी, हवालदार माने आदी पोलीस उपस्थित होते अधिक तपास नितीन कोराम करीत आहेत.