वार्ताहर / मणेराजुरी (सांगली)
मणेराजुरी-तासगाव राज्य मार्गावर डंपर व छोटा हत्ती टेम्पोच्या भीषण अपघातात एक ठार एक गंभीर जखमी झाला. समोरासमोर धडकेमुळे छोटा हत्तीमधील द्राक्षे रस्त्यावर पसरली होती. अपघात मंगळवारी सकाळी 11.45 च्या दरम्यान झाला. या घटनेची तासगाव पोलिसात नोंद झाली आहे. मृत चालक असून त्याचे नाव महंमद नजाक नगारजे (वय 28) आहे. तर जखमीचे नाव साबू महादेव नेटगुट (वय 28 दोघेही रा. तिकोंडा जि. विजापूर कर्नाटक) असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, माल वाहतूक करणारा टेम्पो (क्र.के.ए.28 डी. 5229) हा वाळवा येथून तिकोंडा येथे द्राक्ष घेऊन चालला होता. तर डंपर (क्र. एम.एच.12 सी.ए. 2719) हा मणेराजुरी येथून मुरुम भरुन तासगावच्या दिशेने जात होता. दोन्ही वाहने भरधाव वेगात होती. टेम्पो रासाळे वस्ती येथे ओव्हरटेक करत असताना डंपरशी सामोरासमोर धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की टेम्पोचा चक्काचूर झाला, डंपरची मागील चाके तुटून बाजूला गेली. टेम्पो चालक महंमद नगाराजे, शेजारी बसलेला साबू नेटगुट यांना जोरदार धडक बसल्याने गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना तासगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने चालक महंमद नगारजे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर हा साबू नेटगुट गंभीर जखमी झाला असून त्याच्या वर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची तासगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून प्राथमिक तपास पोलीस नाईक अमोल पाटील करीत आहेत.
108 ऍम्ब्युलन्स वेळेत आली नाही
अपघात झाल्यानंतर नागरिकांनी अत्यावश्यक सेवा देणाऱया 108 ऍम्ब्युलन्सला सुमारे 25 मिनिटे कॉल करुन ती वेळेत आली नाही. त्यामुळे चालक महंमद नगारजे हा 25 मिनिटे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. खासगी वाहनानेही त्यास घेण्यास नकार दिला त्यामुळे त्याच्यावर वेळेत उपचार झाले नाहीत. शेवटी एका खासगी पीकअपमधून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. वेळेत 108 आली असती तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. 108 च्या या गलथान कारभारावर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.








