राज्यभरातील 1500 कर्मचारी संपावर : ग्राहकांना मिळेना सेवा : साताऱयातील शाखांनाही टाळे
चंद्रकांत देवरुखकर / सातारा
लॉकडाऊन, कोरोना संसर्गाचे कारण पुढे करत मणीपूरम गोल्ड फायनान्स कंपनीने कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून वेतनच दिले नाही. त्यामुळे राज्यभरातील विविध शाखांमध्ये असलेल्या 1500 कर्मचाऱयांनी संपाचे हत्यार उपसले. परिणामतः मणीपूरम गोल्डच्या राज्यभरातील सर्व शाखा बंद असल्याने ग्राहकांना सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. अनेकांना त्यांचे दागिने सोडवायाचे आहे मात्र शाखाच बंद असल्याने ते सोडवता येत नाही. उलट व्याजाचा अधिक भुर्दंड पडण्याची शक्यता असल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
याबाबत ग्राहक तसेच कर्मचाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यभरात मणीपूरम गोल्ड फायनान्स कंपनीच्या शाखा आहे. यामधून सोने तारण ठेवून ग्राहकांना कर्ज दिले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कोरोना स्थितीमुळे सर्वजण अडचणीत आले. त्यामुळे कंपनीने कर्मचाऱयांची पगार कपात केली. कर्मचारीही समजून घेत होते. मात्र, त्यानंतर कंपनीने गेल्या चार महिन्यापासून कर्मचाऱयांचे वेतनही केले नाही. त्यामुळे संसार चालवणे मुश्किल झाल्याने कर्मचाऱयांनी वेतनाबाबत कंपनीकडे मागणी केल्यावर कंपनीने कोरोना स्थितीचे कारण पुढे केले.
मात्र, कंपनी व्यवस्थापनाने सातत्याने महाराष्ट्रातील कर्मचाऱयांवर अन्याय केला असल्याचे कर्मचाऱयांचे म्हणणे आहे. किमान वेतन कायद्याचे उल्लंघन, मराठी कर्मचाऱयांच्या अन्यायकारक बदल्या, वारंवार जाचक अटी लादून कर्मचाऱयांचे शोषण आणि त्यातच गेल्या चार महिन्यापासून पगार नसल्याने कर्मचाऱयांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना भारतीय कामगार सेनेने पाठबळ दिले आहे.
राज्यभरातील 1500 कर्मचाऱयांनी संप केल्यामुळे मणीपूरम गोल्ड फायनान्स कंपनीच्या सर्व शाखा बंद आहेत. त्यामुळे त्या त्या जिल्हय़ातील ग्राहकांना सेवा मिळणे दुरापास्त झालेय. व्याज भरायचे असल्यासे ऑनलाईन भरण्याची सुविधा आहे. मात्र प्रत्येक ग्राहकाला ती सुविधा वापरता येत नाही. तर अनेकांना त्यांचे दागिने सोडवायचे आहेत. मात्र शाखा बंद असल्याने ग्राहकांचे दागिने अडकून पडल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.
कंपनी-कर्मचाऱयांच्या वादात ग्राहकांचे हाल
कंपनी व्यवस्थापनाबरोबर मागण्यांबाबत कर्मचाऱयांचा वाद सुरु आहे. त्याबाबत उच्च न्यायालयात ही बाब न्यायप्रविष्ट आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत हा वाद गेला. तिथे कपंनी व्यवस्थापन वेळकाढूपणाची उत्तरे देत असल्याचा कर्मचाऱयांचा आरोप आहे. मात्र, कंपनी व कर्मचाऱयांच्या वादात ग्राहकांचे हाल सुरु आहेत. शाखा बंद असल्याने नेमके काय झालेय? असा सवाल काही ग्राहकांना पडला आहे. तर व्याज वेळेवर न भरल्यास दंड व्याज आकारणारी कंपनी आता ग्राहकांना सूट देणार आहे का? असाही ग्राहकांचा सवाल आहे.
कंपनीच्या शाखा तातडीने सुरु कराव्यात
मणीपूरम गोल्ड फायनान्स ही केरळ येथून महाराष्ट्रात फायनान्सचा व्यवसाय करायला आलेली कंपनी आहे. कंपनीने महाराष्ट्रातील कर्मचाऱयांना चार महिन्याचे वेतन दिलेले नाही. वेतन मागितले तर केरळ, कर्नाटक राज्यात बदली करुन कर्मचाऱयांवर अन्याय केलाय. कर्मचाऱयांनी 19 नोव्हेंबर पासून संप केलाय. पण ज्या कर्जदारांमुळे कंपनी चालते आहे त्यांचा पण कंपनीने अजिबात विचार केला नाही. कंपनीच्या शाखा बंद असल्याने ग्राहकांची अडचण झालीय. पैसे असून पण दागिने सोडविता आले नाहीत. त्यामुळे मनस्तापाबरोबरच कंपनी बंद पण व्याज सुरु असा हा प्रकार असून कर्जदारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कंपनीने स्टाफचा प्रश्न मिटवून कर्जदारांना बंद दिवसाचे व्याज माफ करावे.









