इंफाळ शांत, हिंसाचारात 54 जणांचा मृत्यू
► वृत्तसंस्था / इंफाळ
गेल्या आठवडाभर मणीपूर राज्यात होत असलेला हिंसाचार आता शांत झाला असून राज्य हळूहळू पूर्वपदावर येत आहे. राजधानी इंफाळमध्ये आता पूर्ण शांतता निर्माण झाली असून जनजीवन सुरळीत होत आहे. राज्यातील मैतेयी समाजाला अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीवरुन हा हिंसाचार उफाळला होता. केंद्र सरकारने तेथे केंद्रीय सुरक्षा दलांची नियुक्ती केली आहे.
आसाम रायफल्स, जलदगती दलांच्या तुकड्या आणि सेनेच्या काही तुकड्या हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी नियुक्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे परिस्थिती पूर्ववत होत आहे. या हिंसाचारात 54 लोकांचा बळी गेला आहे. तसेच अनेक लोक जखमी झाले आहेत. 1,100 हून अधिक जणांनी जवळच्या आसाम राज्यात आश्रय घेतला आहे, असे वृत्त आहे. जाळपोळीच्या अनेक घटना घडल्या असून कोट्यावधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेची हानी झाली आहे.

बाजारपेठ सुरु
मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये शनिवारी बाजारपेठा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे तेथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गेले काही दिवस लोकांना खरेदीसाठी घराबाहेर पडला आले नव्हते. त्यामुळे शनिवारी अनेक लोक खरेदीला बाहेर पडलेले दिसून आले. बाजारपेठा जवळपास दिवसभर सुरु होत्या. मात्र, मार्गांवर केंद्रीय सुरक्षा दलांच्या तुकड्यांची गस्त घालण्यात येत होती.
10,000 सुरक्षाकर्मी नियुक्त
केंद्रीय राखीव पोलिस दल व इतर केंद्रीय सुरक्षा दलांच्या अनेक तुकड्या हिंसाचारग्रस्त भागांमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. सुरक्षा सैनिकांची संख्या 10 हजारांहून अधिक आहे. राज्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. अद्यापही काही भागांमध्ये ती आहे. काही भागांमध्ये दिसताक्षणीच गोळी घालण्याचे आदेशही लागू करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी रात्रीपासून हिंसाचार निवळला असून सुरक्षा दलांनी शांतता प्रस्थापित केली आहे.
भीतीचे वातावरण
राज्यात अद्यापही भीतीचे वातावरण दिसून येते, असे प्रत्यक्षदर्शींनी स्पष्ट केले. इतक्या मोठ्या प्रमाणात अचानकपणे हिंसाचार उफाळण्याची शक्यता कित्येकांना प्रथम वाटत नव्हती. मात्र, तसे घडल्याने लोकांची चिंता अधिकच वाढली होती. यामुळे 1,100 हून लोकांनी आंतरराज्य सीमारेषा ओलांडून आसामध्ये प्रवेश केला होता. अद्यापही अनेक लोकांनी आसामच्या काछर जिल्ह्यात आश्रय घेतलेला आहे. त्यांच्या आहाराची आणि औषधपाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
कुकी लोक अधिक
स्थलांतर करण्यामध्ये कुकी समुदायाच्या लोकांची संख्या अधिक आहे. त्यांच्यावर आंदोलकांनी हल्ला केल्याचा त्यांचा आरोप आहे. कुकी लोकांच्या घरांचीची नासधूस करण्यात आली असल्याच्या तक्रारी सादर झाल्या आहेत. त्यांना संरक्षण देण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाने आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांच्या सुट्ट्या स्थगित करुन त्यांना सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे.
13,000 जण सुरक्षित स्थळी
हिंसाचार सुरु झाल्यानंतर त्वरित केंद्रीय साहाय्यता दलांच्या तुकड्या नियुक्त करण्यात आल्या होत्या. या दलांनी हिंसाचारग्रस्त भागांमधून 13 हजारांपेक्षा अधिक जणांची सुटका करुन त्यांना राज्यातच सुरक्षित स्थळी पाठविले आहे. सेनेच्या तुकड्यांनी त्वरित चूरचांदपूर, मोरे, काकचिंग आणि कांगपोकशी या जिल्ह्यांचे नियंत्रण आपल्या हाती घेतल्याने परिस्थिती लवकर नियंत्रणात आली. इंडिगो एअरलाईन या कंपनीने मणिपूरमध्ये अतिरिक्त विमान उ•ाणे करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच स्थगित पेलेली उ•णे पुन्हा सुरु करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठे साहाय्य मिळणार आहे.
का झाला हिंसाचार
ड मैतेयी समाजाच्या मागणीला कुकींनी विरोध केल्याने हिंसाचार
ड अनुसूचित जातींमध्ये समावेश करण्याची मैतेयींची आहे मागणी
ड केंद्र सरकारकडून दोन्ही समाजांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न
ड हिंसाचाराला प्रारंभानंतर केंद्राची त्वरित कृती, त्यामुळे शांतता









