वृत्तसंस्था/ इम्फाळ
काँग्रेसचे मणिपूरमधील माजी अध्यक्ष गोविंददास कोंथूजाम यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालयात मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग, राज्याचे पक्ष प्रभारी संबित पात्रा आणि राज्यसभा खासदार अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत कोंथूजाम यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे.
कोंथूजाम हे मणिपूरच नव्हे तर ईशान्येतील एक दिग्गज नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यामुळे प्रभावित होत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे पात्रा यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या कामकाजामुळे मणिपूरची जनता अत्यंत प्रभावित असल्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी नमूद पेले आहे.
पक्षासाठी मी पूर्ण मनाने काम करणार आणि पक्षाच्या आदेशानुसार काम करेन. पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळवून देत सत्ता राखण्यासाठी सातत्याने काम करणार असल्याचे कोंथूजाम म्हणाले. कोंथूजाम यांनी काही दिवसांपूर्वी वैयक्तिक कारणांचा दाखला देत मणिपूर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.









