लष्करी इस्पितळात उपचार : राज्यात हिंसाचाराचे सत्र सुरूच
► वृत्तसंस्था/ इंफाळ
ईशान्येकडील राज्य मणिपूर गेल्या दीड महिन्यांपासून हिंसाचाराच्या विळख्यात आहे. 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. निमलष्करी दलांना तैनात केल्यानंतरही जमावाकडून हिंसक घटना सुरूच आहेत. रविवारी रात्री कंटो सबल येथून चिंगमांग गावाच्या दिशेने अचानक गोळीबार सुरू झाला. परिसरात जमाव पाहून लष्कराच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले. यादरम्यान झालेल्या गोळीबारात एक सुरक्षा जवान जखमी झाला असून त्याला लष्करी ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
सुमारे एक महिन्यापूर्वी मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो लोक जखमी झाले आहेत. याशिवाय या हिंसाचारात आगीमुळे हजारो लोकांना घरे सोडावी लागली आहेत. विरोधी पक्ष या प्रकरणावर जोरदार आवाज उठवत आहेत. देशातील एक राज्य आगीने होरपळत असताना पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर जात असल्याबद्दल टीका केली जात आहे. या प्रकरणाबाबत काँग्रेसकडून सत्ताधारी भाजपवर सातत्याने हल्लाबोल करण्यात येत आहे. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदी गप्प का?, असा सवाल काँग्रेस करत आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच हिंसाचारग्रस्त राज्याचा दौरा करत लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानंतर अनेकांनी शस्त्रेही खाली ठेवली होती. मात्र, राज्यातील तणाव अद्याप निवळलेला दिसत नाही.
मुख्यमंत्री घेणार सुरक्षेचा आढावा
राज्यात हिंसाचार सुरू असताना तो शमविण्यासाठी उच्चस्तरीय पातळीवरून मोठ्या हालचाली होताना दिसत नाहीत. मुख्यमंत्रीही या घटनेकडे अतिशय सावधपणे पाहत आहेत. सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपण आता सुरक्षेबाबत आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच हे कसे घडले आणि भविष्यात अशा घटना टाळण्यावर आपण भर देणार असल्याचे वक्तव्य केले आहे.









