पालकांनी व्यक्त केले मुख्यमंत्र्यांचे आभार
प्रतिनिधी/ पणजी
मणिपूर राज्यात उसळलेल्या हिंसाचारामुळे तेथे अडकलेल्या दोन गोमंतकीय विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करून घरी आणण्यात आले. त्याबद्दल त्यांच्या पालकांनी मुख्यमंत्र्यांसह गोवा पोलीस आणि मणिपूर सीआरपीएफ कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले आहेत.
मणिपूर विद्यापीठात क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारी एकमेव गोमंतकीय विद्यार्थीनी सुविद्या नाईक हिने 4 मे रोजी रात्री पालकांना फोन करून मणिपूर येथे मीतेई आणि कुकी या जमातींमध्ये उसळलेल्या हिंसाचार आणि संघर्षांची माहिती दिली.
या हिंसाचारात आंदोलकांनी मणिपूर विद्यापीठाच्या मालमत्तेचीही तोडफोड केली. तेथील परिस्थिती खूप भीतीदायक होती. बहुतेक विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहातून पळून गेले होते. अशा स्थितीत सुविद्या आणि तिचे केरळ राज्यातील 8 ते 10 वर्गमित्र एवढेच विद्यार्थी वसतीगृहात शिल्लक राहिले होते.
तिने केलेल्या फोनवरून तेथील परिस्थिती तणावपूर्ण आणि बिघडत असल्याचे वडिलांच्या लक्षात आले. तिचा घाबरलेला आवाज ऐकून वडील सुनिल नाईक यांनी लगेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिला सुखरूप घरी आणण्याचे आश्वासन दिले.
अशाच प्रकारे गोव्याचा आणखी एक मुलगा अर्णव जयेश कळंगुटकर हाही सुट्टी घालविण्यासाठी आपल्या मामाच्या घरी मणिपूर येथे गेला होता. तोही हिंसाचारामुळे अडकला होता. त्यालाही गोव्यात आणण्याची व्यवस्था करण्यात आली.
याकामी गोव्याचे पोलीस महासंचालक डॉ. ए कोआन यांनी मणिपूर सीआरपीएफ लेफ्टनंट कंमांडर रशीद आणि त्यांच्या टीमकडे संपर्क साधला. त्यांच्या प्रयत्नामुळे दोन्ही मुलांना इम्फाळ विमानतळावर घेऊन जाण्याची व्यवस्था केली. तेथून त्यांना प्रथम दिल्ली विमानतळावर व नंतर सुखरूप गोव्यात आणण्यात आले. अशाप्रकारे आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावलेल्या सर्वांचे या मुलांच्या पालकांनी आभार व्यक्त केले आहेत.









