वृत्तसंस्था/ इंफाळ (मणिपूर )
मणिपूरची महिला मार्शल आर्ट फाईटर लेशराम सुरबाला देवीने गॅमा विश्व मार्शल आर्ट स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. मार्शल आर्ट क्रीडाप्रकारात विश्व स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी सुरबाला देवी ही भारताची पहिली महिला फाइटर आहे.
गॅमा विश्व मिश्र मार्शल आर्ट स्पर्धेत सुरबाला देवीने कझाकस्तानच्या टॉमरीस झुसुपोव्हाचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. बहरीनमध्ये 2019 साली झालेल्या गॅमा विश्व मार्शल आर्ट स्पर्धेत खेळताना तिच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तिला दोन वर्षे मार्शल आर्ट क्षेत्रापासून अलिप्त राहावे लागले होते.









