पेनल्टी शूटआऊटमध्ये रेल्वेवर मात, रोशिनी देवीचे अप्रतिम गोलरक्षण
वृत्तसंस्था/ कोझिकोडे
मणिपूरच्या महिला फुटबॉल संघाने वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिपचे जेतेपद स्वतःकडेच राखण्यात यश मिळविले. पेनल्टी शूटआऊटमध्ये मणिपूरने रेल्वेचा 2-1 असा पराभव केला.
या अंतिम सामन्याच्या निर्धारित वेळेत व जादा वेळेतही दोन्ही संघांना गोल नोंदवता आला नाही. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. मणिपूरची गोलरक्षक ओकराम रोशिनी देवीने तीनदा अप्रतिम बचाव करीत आपल्या संघाला या स्पर्धेचे 21 वे जेतेपद मिळवून दिले. मणिपूर संघाची प्रशिक्षक ओइनम बेमबेम देवीसाठी देखील हे जेतेपद विशेष महत्त्वाचे ठरले. तिने खेळाडू या नात्याने ही स्पर्धा यापूर्वी जिंकलेली आहे. ‘संघाची सदस्य म्हणून स्पर्धा जिंकल्यानंतर आता प्रशिक्षक या नात्याने ही स्पर्धा जिंकल्याचा मला खूप आनंद वाटतो. संघातील मुलींनी खूप चांगले प्रदर्शन केले आणि जेतेपद स्वतःकडेच राखण्यात त्यांनी यश मिळविले, याचा मला अभिमान वाटतो,’ अशा भावना तिने व्यक्त केल्या.
या सामन्यात मणिपूरचेच रेल्वेवर पूर्ण वर्चस्व राहिले असले तरी रेल्वेचा बचाव भेदण्यात त्यांना यश मिळाले नाही. प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्रात मुसंडी मारता येत नसल्याने त्यांना लांब पल्ल्याच्या फटक्यावरच जास्त प्रयत्न करावे लागले. त्यामुळे रेल्वेची गोलरक्षक स्वर्णमयी समलला फारसे काम करावे लागले नाही. 90 व्या मिनिटाला मात्र समलने रेल्वेला गोल जवळपास बहालच केला होता. एका क्रॉसच्या उंचीचा तिला अंदाज आला नाही. पण तिने चेंडूला जाळय़ात जाण्यापासून कसेबसे रोखण्यात यश मिळवित निर्धारित वेळेतील संघाचा पराभव टाळला. गोलशून्य बरोबरीमुळे जादा वेळेचा अवलंब केला. पण यावेळी खेळाडूंवर थकव्याचा परिणाम जाणवू लागला होता. अनेक जणींना पायात गोळे आले तर काहींना स्नायू दुखापत झाल्याचे दिसून आले.
पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन स्पॉट किकनंतर दोन्ही संघांत बरोबरी होती. एकावर गोल झाला, एक हुकला तर एक वाचविला गेला. रोशिनी देवीने यानंतर आणखी दोन पेनल्टीवर अप्रतिम बचाव केला तर तिची सहकारी किरणबाला देवीने चौथ्या पेनल्टीवर गोल नोंदवून मणिपूरच्या बाजूने सामना फिरविला.









